Due to rains, farmers' worries increased; In eight months, 99 farmers ended their lives
नरेंद्र पाटील
जळगाव : खरीप हंगामाला सुरुवात होऊन पिकांची उगवण झालेली असतानाच गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मध्यम व काळपट जमिनी असलेल्या भागात सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकांनी तग धरला असला, तरी आता पावसाने ओढ दिल्यास पिकांवर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावरच शेतकरी पुन्हा आर्थिक संकटाच्या छायेत सापडला आहे.
एकीकडे पावसाअभावी पिकांची चिंता असताना दुसरीकडे शेतकऱ्यांकडून जीवन संपवण्याचे सत्रही थांबलेले नाही. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ९९ शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची नोंद आहे. यापैकी ४७ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली असून २२ प्रकरणे अपात्र ठरली आहेत, तर तब्बल ३० प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.
महिनानिहाय आकडेवारी पाहता जानेवारीत १५ शेतकऱ्यांनी जीवन संपवले. यापैकी १३ प्रकरणे पात्र, तर दोन प्रकरणे अपात्र ठरली. फेब्रुवारीत १० जीवन संपवल्याची नोंद असून सहा प्रकरणे पात्र आणि चार अपात्र ठरली. मार्चमध्ये १४ शेतकऱ्यांनी जीवन संपवले. त्यापैकी नऊ प्रकरणे पात्र, तीन अपात्र, तर दोन प्रकरणे प्रलंबित आहेत. एप्रिलमध्ये १३ जीवन संपवल्याची नोंद झाली असून सात प्रकरणे पात्र आणि सहा अपात्र ठरली.
मे महिन्यात १२ शेतकऱ्यांनी जीवन संपवले. यापैकी आठ प्रकरणे पात्र, तीन अपात्र आणि एक प्रकरण प्रलंबित आहे. जूनमध्ये ११ जीवन संपवल्याच्या नोंदी झाली असून दोन प्रकरणे पात्र, तीन अपात्र आणि सहा प्रकरणे प्रलंबित आहेत.
जुलैमध्येही ११ शेतकऱ्यांनी जीवन संपवले. यापैकी दोन प्रकरणे पात्र, एक अपात्र, तर तब्बल आठ प्रकरणे प्रलंबित आहेत. ऑगस्टमध्ये १३ शेतकरी जीवन संपवण्याची नोंद झाली असून या सर्व १३ प्रकरणांची पात्रता अद्याप प्रलंबित आहे.
आठ महिन्यांची महिनानिहाय स्थिती
महिना. जीवन संपवले पात्र. अपात्र प्रलंबित
जानेवारी. १५. १३. २. ०
फेब्रुवारी. १०. ६. ४. ०
मार्च. १४. ९. ३. २
एप्रिल. १३. ७. ६. ०
मे. १२. ८. ३. १
जून. ११. २. ३. ६
जुलै. ११. २. १. ८
ऑगस्ट. १३. ०. ०. १३
एकूण. ९९. ४७. २२. ३०
पावसाने ओढ दिल्यास खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच कर्जबाजारीपणा, उत्पादन खर्च आणि शेतीमालाच्या दराच्या समस्यांशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता पावसाचे नवे संकट उभे राहिले आहे. जीवन संपवण्याच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पिकांची परिस्थिती, पावसाची स्थिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.