Self Enumeration Portal Jalgaon Pudhari
जळगाव

Jalgaon Census | जळगावात १ मेपासून 'स्व-गणने'चा श्रीगणेशा; स्वतःची माहिती स्वतः ऑनलाईन अशी भरा

स्वतःची माहिती स्वतः भरा, प्रगणकाला द्या 'रेफरन्स नंबर'; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे जळगावकरांना आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Self Enumeration Portal Jalgaon

जळगाव: देशाच्या आगामी जनगणनेसाठी आता डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय सुरू होत आहे. १ मे (महाराष्ट्र दिना) पासून जनगणनेच्या प्रक्रियेत 'स्व-गणना' (Self-Enumeration) ही संकल्पना राबवली जाणार आहे. स्वतःची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी गुरूवारी (दि.३०) पत्रकार परिषदेत केले. ही जनगणना १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असल्याने तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

काय आहे प्रक्रिया?

केंद्र सरकारच्या या डिजिटल जनगणनेत नागरिकांना घरबसल्या माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना https://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करायची आहे. या पोर्टलवर माहिती भरण्यासाठी १६ भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.

कशी भरावी माहिती?

प्रथम संबंधित वेबसाईटवर जाऊन कुटुंब प्रमुखाचा मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी (OTP) द्वारे लॉग-इन करावे.

त्यानंतर विचारलेल्या ३३ प्रश्नांची अचूक माहिती भरावी.

माहिती भरून पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक 'रेफरन्स नंबर' मिळेल.

१ जून ते १४ जून या कालावधीत जेव्हा प्रगणक (Enumerator) तुमच्या घरी येतील, तेव्हा त्यांना हा 'रेफरन्स नंबर' द्यावा. या नंबरद्वारे प्रगणक तुमच्या माहितीची पडताळणी करतील.

३३ प्रश्नांचा 'डिजिटल' फॉर्म

या जनगणनेत घराच्या बांधकामापासून ते घरातील सोयीसुविधांपर्यंत सविस्तर माहिती विचारली जाणार आहे. यामध्ये इमारत क्रमांक, घराच्या जमिनीचे व भिंतींचे साहित्य, कुटुंबातील एकूण सदस्य, मालकी हक्क, पिण्याचे पाणी, शौचालयाची उपलब्धता, एलपीजी जोडणी, इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप, सायकल-कार यांसारख्या ३३ प्रश्नांचा समावेश असणार आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी या ऐतिहासिक जनगणनेच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT