जळगाव : जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढायचा असेल तर सत्तेत असणे आवश्यक आहे. कारण सत्तेत असताना निर्णय घेण्याची क्षमता मिळते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते जळगाव येथे आयोजित ‘समृद्ध खानदेश संकल्प’ कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री नामदार छगन भुजबळ, ना. नरहरी झिरवाळ, ना. माणिराव कोकाटे तसेच जिल्ह्यातील आमदार अनिल भाईदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, उत्तर महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता महत्त्वाची आहे. वडिलोपार्जित शेतीपुरते थांबून चालणार नाही, काळाची गरज ओळखून उद्योग, शेती व पायाभूत सुविधा यासाठी नवे निर्णय घ्यावे लागतील. विमानतळ आहे, धावपट्टी आहे, पण नाईट लँडिंगची सोय झाली तरच त्याचा खरा उपयोग होणार आहे.
यावेळी त्यांनी आदिवासी समाज, भटक्या-विमुक्त यांना न्याय देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या कार्याचा उल्लेख केला. सर्व जाती-धर्मांना न्याय मिळावा, एकमेकांबद्दल आकस न ठेवता मार्ग काढावा, हा आमचा प्रयत्न आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो, कायदा हातात घेऊ नये, असेही त्यांनी नागरिकांना आवाहन केले.
शेतकऱ्यांविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, आपला शेतकरी-कष्टकरी हाच मूळ आधार आहे. नुकसानीमुळे लवकरच पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून खतांची बचत, पाण्याची बचत आणि पिकांचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. मी स्वतः हाडाचा शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या मला जाणवतात, असेही त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधाताना सांगितले.