Jalgaon News
जळगाव: चोपडा शहरात पुन्हा एकदा रक्ताची होळी खेळली गेली असून, जुन्या वादाच्या कारणावरून एका ३३ वर्षीय तरुणाची धारधार हत्याराने चेहरा आणि डोके ठेचून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. प्रदीप राजेंद्र महाजन (वय ३३, रा. तारामती नगर असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे चोपडा परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून एकाला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रदीप महाजन आणि आरोपींमध्ये जुने वैमनस्य होते. याच रागातून आरोपी चेतन सुभाष कांडे याच्या सांगण्यावरून विजय भास्कर वैदकर (रा. भाग्योदय नगर) आणि निर्मल संजय बडगुजर (रा. चिंच चौक) यांनी कट रचला. १९ एप्रिलच्या रात्री ९ ते २० एप्रिलच्या सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास चोपडा ते धरणगाव रोडवरील हॉटेल रोहितच्या मागे, पाटचारीजवळ प्रदीपला गाठण्यात आले.
आरोपींनी प्रदीपवर हल्ला चढवत हत्याराने त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. इतक्यावरच न थांबता त्याचा चेहरा पूर्णपणे ठेचून काढला, जेणेकरून त्याची ओळख पटू नये. सुडाच्या या वणव्यात प्रदीपचा जागीच मृत्यू झाला. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
आपल्या तरुण मुलाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून वडील राजेंद्र सोमा महाजन यांनी हंबरडा फोडला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विजय वैदकर, निर्मल बडगुजर आणि चेतन कांडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३(५) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी चक्र फिरवली असून, आरोपी क्रमांक ३ चेतन कांडे याला २० एप्रिल रोजी रात्री उशिरा अटक केली आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले हे स्वतः करत आहेत.