

विटा : शेतात बोअरवेलचे काम सुरू असताना मजुरांच्या दोन गटात वाद सुरू झाला. या वादात बहिणीबद्दल अपशब्द बोलल्याचा राग मनात धरून एका मजुराने दुसऱ्याच्या छातीत चाकू खुपसून त्याचा निर्घृण खून केला. विजय माणिक पानसे (वय २६) असे हत्या झालेल्या मजुराचे नाव असून याप्रकरणी बोरिंग मशीन चालक जयवंत नारायण देशमुख (रा. माधवनगर ता.मिरज) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रोशन यशवंत चौहान याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.१३) दुपारी १२ ते १२:३० च्या दरम्यान खानापूर तालुक्यातील कार्वे येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्वे (ता.खानापूर) गावाच्या हद्दीतील गट नंबर १८८ मध्ये एका शेतातील विहिरीत बोअर पाडण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या कामासाठी मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मजूर आलेले आहेत. सोमवारी (दि.१३) दुपारी १२ ते १२:३० च्या सुमारास कामाची सुट्टी झाल्यानंतर सर्व मजूर जेवणासाठी जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली जमले होते. जेवण आटोपल्यानंतर काही मजूर पुन्हा कामाच्या ठिकाणी परतले, तर विजय पानसे आणि रोशन चौहान हे दोघे तिथेच थांबले होते.
यावेळी विजय पानसे याने रोशन चौहान याच्या बहिणीबद्दल अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. हा वाद इतक्या टोकाला गेला की, रागाच्या भरात असलेल्या रोशनने जवळच असलेला आंबा कापण्याचा चाकू उचलला आणि विजयच्या छातीवर सपासप वार केले. वार इतका वर्मी होता की, विजयचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी आणि इतर मजुरांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. संशयित रोशन यशवंत चौहान (रा. सुनालोमा बुरडोना, जि. बैतुल) याला पोलिसांनी अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भरदुपारी झालेल्या या घटनेमुळे कार्वे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.