Chennai Trader Financial Cyber Fraud
जळगाव : स्वस्त दरात मक्याचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून चेन्नई येथील एका व्यापाऱ्याची तब्बल २१ लाख ९४ हजार ४४० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधून मक्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार निश्चित करण्यात आला. मात्र, पैसे मिळाल्यानंतरही मालाचा पुरवठा न करता संबंधितांनी व्यापाऱ्याची फसवणूक केली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात नागपूर येथील संशयितासह चौघांविरुद्ध आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पी. व्ही. सुरेश (वय ४५, रा. चेन्नई, तामिळनाडू) हे धान्याचे व्यापारी आहेत. सध्या ते जळगावातील भजे गल्ली परिसरातील मयूर लॉज येथे वास्तव्यास आहेत. संशयित शामलाल, विशाल शुक्ला (रा. नागपूर), अविनाश पाटील आणि अजित जागीर सिंग सिद्धू यांनी फेसबुकच्या माध्यमातून सुरेश यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन करून मोठ्या प्रमाणावर मका पुरवठा करण्याचा व्यवहार निश्चित केला.
संशयितांनी मक्याचा माल पाठविण्याचे आश्वासन देत सुरेश यांच्याकडून २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांत ऑनलाइन पद्धतीने पैसे घेतले. संबंधित बँक खात्यांमध्ये एकूण २१ लाख ९४ हजार ४४० रुपये वर्ग करण्यात आले. मात्र, संपूर्ण रक्कम स्वीकारल्यानंतरही व्यापाऱ्याला मक्याचा माल पाठविण्यात आला नाही.
सुरेश यांनी वारंवार संपर्क साधून मालाबाबत विचारणा केली. मात्र, संशयितांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून शामलाल, विशाल शुक्ला, अविनाश पाटील, अजित जागीर सिंग सिद्धू तसेच संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आंतरराज्यीय ऑनलाइन फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत.