Central Railway Zero Scrap Mission
जळगाव : मध्य रेल्वेने 'शून्य भंगार स्थिती' (मिशन झिरो स्क्रॅप) गाठण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल तिजोरीसाठी 'सोन्याचे' ठरले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये केवळ भंगार विक्रीतून रेल्वेने तब्बल ४०४.७२ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल गोळा केला आहे. विशेष म्हणजे, यात भुसावळ विभागाने ९७.७२ कोटींची कमाई करत संपूर्ण मध्य रेल्वेत आपले वर्चस्व सिद्ध केले असून, जळगाव जिल्ह्यासह खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
मागील वर्षाचा विक्रम मोडीत ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, मध्य रेल्वेने मागील वर्षाच्या तुलनेत २.८१ टक्के अधिक वृद्धी नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच काळात ३९३.६५ कोटींचे भंगार विकले गेले होते. रेल्वे रुळांपासून ते जुन्या इंजिनपर्यंतच्या टाकाऊ साहित्याची विल्हेवाट लावून ही 'कॅश' जमवण्यात आली आहे. संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि पर्यावरणीय शाश्वतता जपण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ही धडाकेबाज मोहीम राबवली आहे.
रेल्वे रूळ: ४०,१७७ मेट्रिक टन
स्लीपर्स: २,५५,३१८ नग
लोखंडी (फेरस) भंगार: २५,७९० मेट्रिक टन
नॉन-फेरस भंगार: ३,३२५ मेट्रिक टन
रोलिंग स्टॉक: ४७ लोकोमोटिव्ह (इंजिन), ७० कोच आणि ११० वॅगन.
भुसावळ विभाग 'नंबर वन'! मध्य रेल्वेच्या पाचही विभागांमध्ये भुसावळ विभागाने आपली आक्रमकता कायम ठेवली आहे. ११.०२.२०२६ पर्यंत भुसावळ विभागाने एकट्याने ९७.७२ कोटी रुपयांची भंगार विक्री केली असून तो आघाडीवर आहे. जळगाव आणि परिसरातील रेल्वेच्या मालमत्तांचा शोध घेऊन, जुने साहित्य हटवून प्रशासनाने ही कामगिरी केली आहे.
मोठ्या वर्कशॉप्सची सघन मोहीम मध्य रेल्वेच्या स्टोअर्स विभागाने केवळ मोठ्या यार्डांवरच नव्हे, तर दुर्गम भागात विखुरलेल्या साहित्यावरही लक्ष केंद्रित केले. यात कुर्ला कटिंग यार्ड, नाशिकचे ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप, परळ आणि मनमाड वर्कशॉपमध्ये मोठ्या स्तरावर शोध मोहीम राबवून भंगार संकलित करण्यात आले.
आर्थिक विवेक आणि स्वच्छता "शून्य भंगार मिशन" केवळ पैसा कमवण्यासाठी नसून रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या यशातून मध्य रेल्वेचा आर्थिक शिस्त आणि कार्यक्षमतेचा संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.