Robbery Case Pudhari
जळगाव

Jalgaon Robbery | कजगाव विद्युत उपकेंद्रात चोरट्यांचा डल्ला; साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास

ट्रान्सफॉर्मर फोडून कॉपर कॉईल व ऑईल चोरी; भडगाव पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Kajgaon Power Substation Robbery

जळगाव : तालुक्यातील कजगाव येथील विद्युत उपकेंद्रात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील महागडे कॉपर कॉईल आणि ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरून नेण्यात आले. या चोरीत सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला असून, उपकरणांची तोडफोड करून मोठे नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एनसीसी लिमिटेड कंपनीचे डेप्युटी मॅनेजर निखिलेश नारायणजी झाडे (वय ३९, रा. अण्णा चौक, जळगाव, मूळ मध्य प्रदेश) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपासून २३ ऑगस्टरोजी दुपारी २ वाजेपर्यंत कजगाव विद्युत उपकेंद्रात ही चोरी झाली.

अज्ञात चोरट्यांनी उपकेंद्रात प्रवेश करून ट्रान्सफॉर्मर फोडला. त्यातून सुमारे १२०० किलो वजनाचे ३ लाख रुपये किमतीचे कॉपर कॉईल तसेच सुमारे ३ हजार लिटर आणि १ लाख ६० हजार रुपये किमतीचे ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरून नेले.

चोरी करताना चोरट्यांनी उपकेंद्रातील गॅसकीट सेट, इन्सुलेशन किट, कोर सेट, इक्वेलायझर पाईप आणि डबल फ्लोट बॉक्स रिपेअर सेटचीही तोडफोड केली. यातील काही साहित्य जवळच्या शेतात आढळून आले आहे. त्यामुळे चोरीसोबतच विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी निखिलेश झाडे यांच्या फिर्यादीवरून २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर सोनवणे पुढील तपास करीत असून, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT