जळगाव

BJP Jalgaon Office | भाजपची 'वसंत स्मृती' विस्मरणात! संघर्षाच्या भिंती रडतायत, सत्तेचे वारसदार 'हायटेक' एसीत दंग!

ज्या कार्यालयाने नेते घडवले, तिथेच आता 'अडगळ'; नव्या-जुन्यांच्या वादात जुन्या आठवणींना 'तिलांजली'?

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला शून्यातून विश्व निर्माण करून देणारे, तब्बल ४०-४५ वर्षांच्या संघर्षाचे साक्षीदार असलेले 'वसंत स्मृती' हे कार्यालय आज उपेक्षित ठरले आहे. ज्या कार्यालयाने जिल्ह्याला मंत्री, आमदार आणि दिल्ली-मुंबईपर्यंत वजन असणारे नेतृत्व दिले, त्याच कार्यालयाला आज 'अडगळीचे' स्वरूप प्राप्त झाले असून, सत्तेच्या झगमटात वावरणारे नेते आता 'जीएम फाउंडेशन'च्या हायटेक वास्तूत विसावले आहेत. यामुळे संघर्षाचा काळ पाहिलेले जुने कार्यकर्ते आणि सत्तेच्या काळात आलेले 'हायटेक' नेते असा सुप्त संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.

संघर्षाची भिंत अन् सत्तेचा थाट

एकेकाळी 'वसंत स्मृती'मध्ये भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठका व्हायच्या. तिकीट मिळवण्यासाठी उमेदवार तासनतास येथे ताटकळत बसायचे. ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषद आणि मंत्रालयापर्यंत सत्ता खेचून आणण्याचे रणनीतीचे केंद्र म्हणजे हीच 'वसंत स्मृती'. मात्र, आज याच कार्यालयावर 'मंडळ एक'चा बोर्ड लावून त्याला एका कोपऱ्यात ढकलून देण्यात आले आहे. दुसरीकडे, अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज झालेले जीएम फाउंडेशनचे कार्यालय आता भाजपचे अनधिकृत मुख्य केंद्र बनले आहे.

जुन्यांची उपेक्षा, नव्यांची चंगळ?

ज्या भिंतींनी कार्यकर्त्यांचा घाम आणि नेत्यांचा संघर्ष पाहिला, त्याच भिंती आज भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या विस्मरणात गेल्या आहेत. 'वसंत स्मृती'मध्ये बसणे आता नेत्यांना 'अवघड' वाटू लागले असून, हायटेक कार्यालयाची ओढ वाढली आहे. ज्यांनी संघर्ष पाहिला त्यांना 'अडगळीत' टाकले आणि जे थेट सत्तेच्या मांडवात बसले त्यांना 'पुढे' केले, अशीच काहीशी भावना निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

नव्या-जुन्यांचा वाद चव्हाट्यावर

राजकारणात नव्या-जुन्यांचा वाद हा नेहमीचाच असतो, पण जळगावात हा वाद वास्तूच्या रूपाने समोर आला आहे. वसंत स्मृतीला केवळ नावापुरते 'स्मृती'मध्ये ठेवून भाजपने आपल्या मूळ संघर्षाच्या केंद्राकडे पाठ फिरवली आहे. आधुनिकतेच्या नावाखाली जुन्या आठवणींना आणि संघर्षाला तिलांजली देण्याचा हा प्रकार पक्षाच्या भविष्यासाठी कितपत हिताचा ठरेल, हा आता चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT