

प्रविण शिंगटे
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी बराच राडा झाला. त्यानंतर विषय समिती सभापती निवडीतही बराच काथ्याकूट झाला. या निवडींमध्ये राजकारणाचा संघर्ष टोकाला गेला. एवढ्या सगळ्या उचापती करून पदावर बसल्यानंतरही पदाधिकाऱ्यांचा कारभार सुरू झाला नसल्याचे चित्र ‘पुढारी’ने सोमवारी केलेल्या ऑन द स्पॉट स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसले. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कृषी सभापती सोडून अन्य पदाधिकाऱ्यांची कार्यालये बंदच होती. दुपारपर्यंत तरी ते आपल्या खुर्चीकडे आले नसल्याचे चित्र झेडपीत दिसून आले.
सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. मात्र, यंदा भाजपने बहुमत नसतानाही त्यांनी जिल्हा परिषदेची सत्ता खेचून आली. यामुळे प्रथमच मिनीमंत्रालयावर भाजपाने झेंडा फडकावला. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटात राडा झाला. या राजकीय राड्यात अध्यक्षपदी डॉ. प्रिया शिंदे तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली. त्यानंतर शनिवारी झालेल्या विषय समिती सभापती निवडीतही ड्रामा झाला. या निवडीत शिक्षण व अर्थ समिती सभापतीपदी तेजस्विनी कदम, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतीपदी लता कर्णे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी ऋतुजा शिंदे तर समाजकल्याण समिती सभापतीपदी ऋषिकेश धायगुडे पाटील यांची वर्णी लागली.
दि. 20 मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी होवून 18 दिवसाचा कालावधी लोटला. तर 4 एप्रिलला विषय समिती सभापती निवडी झाल्या. हे सर्व पदाधिकारी बऱ्याच ‘उचापती’ करून पदावर बसले असले तरी अजून त्यांच्याकडून कारभाराचा श्रीगणेशा झाला नसल्याचे दिसून आले. सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस आहे. त्यामुळे जनतेने निवडून दिलेल्या या पदाधिकाऱ्यांनी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मिनी मंत्रालयात दांडी मारल्याचे चित्र दिसलेे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या दालनाला 12 वाजून 57 मिनीटे झाले तरी कडीच होती. मात्र, त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक दुसऱ्या दालनात काम करत होते. तसेच महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे यांच्या दालनाला 12.59 मिनीटे झाले तरी दरवाजा बंद होता. त्यामुळे या परिसरात कर्मचारी नसल्याने शुकशुकाट जाणवत होता.1 वाजून 6 मिनीटापूर्वी शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांचे दालन उघडे होते. मात्र, त्या दालनात उपस्थित नव्हत्या. याचवेळी त्यांचे नातेवाईक दालनातील आसन व्यवस्था कशी असावी यावर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत होते. तसेच तळमजल्यावर समाजकल्याण सभापती यांचे दालन असले तरी 12 वाजून 54 मिनीटे झाले तरी या दालनाच्या दरवाजाला कडीच होती. या ठिकाणी विचारणा करण्यासाठी कोणीच नव्हते. मात्र, उपाध्यक्ष राजू भोसले झेडपीत सकाळीच दाखल झाले होते. त्यांनी बांधकामसह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावाही घेतला. ते दुपारपर्यंत झेडपीत तळ ठोकून होते. त्याच्याबरोबर कार्यकर्त्यांचाही गराडा दिसून आला. तसेच कृषी सभापती लता कर्णे याही आपल्या दालनातून कारभार पाहत होत्या. त्यांच्याकडेही अभ्यागतांची गर्दी दिसत होती. त्यांनीही कृषि व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विविध योजनांचा आढावा घेतला.