जळगाव : भुसावळ शहरातील ताजनगर परिसरात सुरू असलेल्या गांजाच्या काळ्या बाजाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चक्क घरातच गांजाचा साठा करून तो विकणाऱ्या 'अच्चु' टोळीवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली.
या कारवाईत सुमारे २१ किलो ९७२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याचे बाजारमूल्य ४ लाख ३९ हजार ४४० रुपये इतके आहे. या कारवाईत दोन आरोपी अटक करण्यात आली असून दोन आरोपीचा शोध सुरू आहे ,या कारवाईने भुसावळमधील नशेच्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावचे प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक प्रशांत रामदास दरेकर यांना गोपनीय बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली होती की, भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ताजनगर भागात एक इसम आपल्या घरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा करून त्याची विक्री करत आहे. या माहितीची खातरजमा होताच गुरुवारी १४ मे रोजी ताजनगरमधील शाळा क्र. ३ जवळ असलेल्या एका घरावर पोलिसांनी छापा टाकला.
शेख अजिज अब्दुल मजिद ऊर्फ 'अच्चु' (वय ४१)च्या घरात झडती घेतली असता, तेथे 'PARAG AGRO' असे नाव लिहिलेल्या दोन गोण्या आढळल्या. या गोण्या उघडल्या असता त्यात हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या आणि बिया असलेला अंमली पदार्थ (गांजा) असा एकूण २१ किलो ९७२ ग्रॅम बाजार किंमत ४ लाख ३९. हजार ,४४० रुपये मूल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी शेख अजिज अब्दुल मजिद ऊर्फ 'अच्चु' (वय ४१) आणि त्याचा मोठा भाऊ सलीम मजिद शेख (वय ४५, दोन्ही रा. ताजनगर, भुसावळ) यांना ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, हा माल आरोपी क्र. ३ अनस (रा. भोपाळ, मध्य प्रदेश) आणि आरोपी क्र. ४ आदिल खान (रा. सिंधी वस्ती, अकोला) यांच्याकडून मागवण्यात आला होता. या टोळीचे धागेदोरे आता पोलिस शोधत आहेत. जळगाव एलसीबीचे पोहेको उमाकांत पन्नालाल पाटील यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिसात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.