जळगाव : भुसावळ शहरातील पाटील मळा परिसरात रात्रीच्या सुमारास एका रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घृण खून करण्यात आला. भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करून हा खून करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रावस्ती नगरात राहणारे रेल्वे कर्मचारी तुषार गोविंदा सोनवणे (वय ३५) हे रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलने (क्रमांक MH 19 CH 1405) पाटील मळा येथून रिंग रोडच्या दिशेने जात होते. रस्त्याच्या वळणावर मारेकऱ्याने तुषार यांच्यावर अचानक चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. हा वार मूळ तुषार सोनवणे रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस यंत्रणा अलर्ट; फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, प्रशिक्षणार्थी डीवायएसपी दरेकर, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी सुद्धा भुसावळ येथे येऊन सदर प्रकरणाची माहिती घेतली तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने व महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत.
रक्तरंजित थरारानंतर पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवून एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे. हा खून जुन्या वैमनस्यातून झाला की यामागे इतर काही आर्थिक अथवा कौटुंबिक वाद आहे, याचा कसून तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.