जळगाव : भुसावळ नगराध्यक्षपदाची लढत यंदा विशेष रंगतदार झाली आहे. माघारीनंतर मैदानात दहा उमेदवार राहिल्याने मतांचे मोठे विभाजन होणार आहे. या परिस्थितीचा थेट फायदा भाजपच्या उमेदवाराला मिळू शकतो, अशी चर्चा शहरात सुरू आहे. माजी आमदारांसह शहरातील काही प्रभावी नेत्यांनी रचलेली राजकीय मांडणी यशस्वी ठरल्याचे दिसत आहे.
भाजपकडून रजनी संजय सावकारे रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात प्रमुख पक्षांचे उमेदवार तसेच पाच अपक्ष उमेदवार उभे असल्याने लढत दहा जणांदरम्यान आहे. मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात टिकल्याने विरोधी मतांचे विभाजन झाले आहे.
गेल्या निवडणुकीत माजी आमदार संतोष चौधरी यांच्या मुलाचा पराभव अल्पसंख्याक मतांच्या विभागणीमुळे झाला होता. याचा विचार करून यंदा भाजपने आखलेली रणनीती पुढे रेटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी अल्पसंख्याक समाजातील अर्शिया अन्सारी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अल्पसंख्याक मतांच्या एकवटण्याची शक्यता कमी झाली आहे.
शरद पवार गटाकडून गौरी गायत्री रूपचंद हे उमेदवार आहेत. एकनाथराव खडसे आणि संतोष चौधरी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अल्पसंख्याक मतांचा काही भाग आणि लेवा पाटील समाजातील मते या उमेदवाराकडे वळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचा प्रभाव मर्यादित असला तरी त्यांच्या स्थानिक पातळीवरील मतांमुळे विरोधी पक्षांचे मतांचे विभाजन होईल. काँग्रेस-आय आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवारही मैदानात असल्याने विरोधी मतविभागणी आणखी वाढेल.
गेल्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पाच हजार मतांनी विजय झाला होता. यंदा विरोधी मतांचे होणारे मोठे विभाजन पाहता भाजपची एकत्रित मतपेटी आणखी ठळक होऊ शकते. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी भाजपचा मार्ग अधिक सोपा झाला आहे.
एकूण दहा उमेदवारांचा हा सामना असला तरी प्रत्यक्ष परिणाम मतविभागणीवरच ठरणार आहे. भाजपचा स्थिर मताधार आणि विरोधकांची विभागलेली मते हे या लढतीचे केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.