जळगाव

Jalgaon crime : भुसावळ पोलिसांचा 'दबंग' कारभार चव्हाट्यावर

गुन्हेगारांचे चेहरे जगासमोर येऊ नयेत म्हणून पोलीस एवढी काळजी का घेत होते?; संतप्त सवाल

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांचे धाडस एवढे वाढले आहे की, भरचौकात गोळीबार करूनही पोलिसांना गुन्हा दाखल करायला तब्बल २० तास घालवावे लागतात. "चोरांना मेजवानी आणि पत्रकारांना दमदाटी" असा नवा प्रकार भुसावळकरांना रस्त्यावर उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळाला.

'साहेबांनी नाही सांगितलं!' फोटो काढणाऱ्या पत्रकारांना पोलिसांची धमकी

दिवसभर पोलीस ठाण्यात चाललेल्या गुप्त खलबतांनंतर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींना घटनास्थळी नेऊन त्यांची बेदम धुलाई करत पट्ट्याने 'आरती' ओवाळण्यात आली. त्यानंतर त्यांची रस्त्यावरून पायी वरात काढण्यात आली, अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींची वरात निघत असताना, जर जनतेला आणि पत्रकारांना त्याचे चित्रीकरण करायचे असेल, तर पोलीस कर्मचाऱ्यांनी "मोबाईल खाली कर, साहेबांनी नाही सांगितलं" म्हणत दमदाटी सुरू केली.

"गुन्हेगारांचे चेहरे जगासमोर येऊ नयेत म्हणून पोलीस एवढी काळजी का घेत होते?" असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. जर पोलिसांना त्यांनी केलेल्या कारवाईची एवढीच भीती वाटत होती, तर ही वरात पोलीस ठाण्याच्या आतच काढायची होती, रस्त्यावर आणून कायदा हातात घेण्याचे नाटक कशासाठी?

या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पोलिसांना गोळीबारावर शंका होती का? गुन्हा दाखल करण्यास झालेला २० तासांचा उशीर पाहता, बाजारपेठ पोलिसांना खरच या गोळीबारावर शंका होती का? असा प्रश्न पडतो. जर गोळीबार झालाच नव्हता, तर मग हे संशयित आरोपी आले कुठून? आणि त्यांची पट्ट्याने आरती का उतरवण्यात आली?

भुसावळात चाललेला हा 'वाघबकर' गोंधळ नेमका कोणाला वाचवण्यासाठी होता? गुन्हेगारांचे फोटो काढण्यापासून पत्रकारांना रोखणारे पोलीस नेमके कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत? गुन्हेगारांवर वचक ठेवण्याऐवजी सामान्य जनता आणि माध्यमांना दमदाटी करणाऱ्या बाजारपेठ पोलिसांच्या या वागण्याला नेमकं काय म्हणावे; असा सवाल निर्माण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT