जळगाव : जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान शनिवार (दि.20) रोजी आज भुसावळमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग ११ ब मधील मतदान केंद्र असलेल्या ब्राह्मण संघ परिसरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट - तुतारी) पक्षाचे उमेदवार समोरासमोर आल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
नियम लावण्यावरून वाद
प्रभाग ११ ब मधील भाजप उमेदवार मेघा देवा वाणी आणि तुतारी गटाच्या उमेदवार भावना अजय पाटील या ब्राह्मण संघ येथील मतदान केंद्रावर समोरासमोर आल्या. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांकडून राबवल्या जाणाऱ्या नियमावलीवरून उमेदवारांनी आक्षेप घेतला. एकाला एक नियम आणि दुसऱ्याला दुसरा नियम का? असे म्हणत उमेदवारांनी अधिकाऱ्यांकडे आपली तक्रार दाखल केली आहे.
अधिकाऱ्यांचा कडक पवित्रा
दोन्ही बाजूंच्या उमेदवारांकडून आणि समर्थकांकडून सुरू असलेल्या वादामुळे केंद्रावर काही वेळ गोंधळाचे वातावरण होते. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून निवडणूक अधिकाऱ्यांनी आवाज चढवत कडक भूमिका घेतली. अधिकाऱ्यांच्या या पवित्र्यानंतर दोन्ही गटांचे उमेदवार शांत झाले आणि पुढील वाद टळला. सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे.
सकाळच्या सत्रातील मतदानाची आकडेवारी अशी...
भुसावळ नगर परिषद क्षेत्रात सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासांत ३.४५ टक्के इतके मतदान झाले आहे.
एकूण ८,३८० मतदारांपैकी २८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, यामध्ये १८७ पुरुष आणि १०२ महिला मतदारांचा समावेश आहे.