ठळक मुद्दे
400 वर्ष जुनी परंपरा असलेला हा बैल पोळा उत्सव ग्रामस्थ आजही पाळत आहे
मानाचा बैल व बैल मालकाचा सन्मान
2.5 x 3 फूटाच्या लहान खिडकीतून बैल मारतो उडी
जळगाव (भुसावळ) : शेतकरी राजाच्या बैलांचा सन्मान करणारा पोळा उत्सव विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वराडसिम गावात पोळा एका वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो आहे. 400 वर्ष जुनी परंपरा असलेला हा उत्सव ग्रामस्थ आजही तितक्याच उत्साहाने जल्लोषात भावभक्तीने साजरा करत आहेत.
गावाच्या मुख्य दरवाजातून मानाचे बैल बाहेर गेल्यानंतर दरवाजा बंद केला जातो. त्यानंतर दरवाज्यालगतची सुमारे 2.5 x 3 फूटाची लहान खिडकी उघडली जाते आणि त्या खिडकीतून धावत आलेले बैल उडी मारून बाहेर जातात. ही अनोखी पद्धत राज्यात इतरत्र कुठेच पाहायला मिळत नाही.
यावर्षी मानाचे बैल म्हणून सुनील प्रताप पाटील, प्रशांत खाचणे व सागर ढाके यांच्या बैलांची निवड झाली. दरवाज्याची खिडकी उघडताच जोगलखोरी येथील गजानन सुरेश पाटील यांच्या बैलाने पहिला क्रमांक पटकावला.
दुसरा क्रमांक – नामदेव हरीशिंग पाटील (वराडसिम)
तिसरा क्रमांक – विकास संतोष पाटील (वराडसिम)
जिंकणाऱ्या बैल व त्यांच्या मालकांना ग्रामपंचायतीतर्फे शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस निरीक्षक महेश गायकवाड व त्यांचे सहकारी कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील, प्रकाश ठाकूर, पोलीस पाटील सचिन वायकोळे, तसेच मनोज कोल्हे यांनी विशेष सहकार्य केले.
ही परंपरा सुमारे 350–400 वर्षांपूर्वी नारायण राघो पाटील यांनी बांधलेल्या गावाच्या दरवाज्याशी ही परंपरा जोडलेली आहे. पोळ्याच्या दिवशी हा दरवाजा बंद करून फक्त खिडकीतूनच बैलांना उडी मारण्याची परंपरा सुरू करण्यात आली. ही अनोखी प्रथा आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे. ग्रामस्थ आजही पुरणपोळीचा नैवेद्य देऊन लाडक्या सर्जाराजाला सजवून त्याची मिरवणूक काढत आहे. त्यानंतर परंपरा पाळली जात आहे. कोविड काळात (2020–21) ही परंपरा दोन वर्षे खंडित झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा उत्साहात परंपरा पुनरुज्जीवन झाले आहे.