

धुळे : धुळे तालुक्यातील बुरझड, आनंदखेडे आणि हेंद्रुण परिसरात हिंस्त्र प्राण्यांनी हैदोस घातला असून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यांत बैल, बकऱ्या व मेंढ्यांची पिले ठार झाली असून शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. पोळ्याच्या दिवशीच लाडका सर्जाराजा गमावल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.
माजी आमदार कुणाल पाटील यांनी या प्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देण्याची मागणी केली आहे.
धुळे तालुक्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या शिवारात बिबट्या, लांडगा व कोल्हा यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी पशुपालकांच्या जनावरांवर वारंवार हल्ले होत असून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
बुरझड शिवारात यादव नाना ठेलारी व पंडित तुकाराम ठेलारी यांच्या मेंढ्यांच्या कळपावर हिंस्त्र प्राण्यांनी हल्ला करून तब्बल 45 कोकरं ठार केली आहेत. हेंद्रुण येथे बेबाबाई सुपडू भिल यांच्या तीन बकऱ्या ठार झाल्या. तर आनंदखेडे येथे कमलाकर कैलास वाघ यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला करून त्याचा बळी घेतल्याने ऐन बैलपोळ्याच्या दिवशी त्यांनी बैल गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात काम करावे लागत आहे. मात्र हिंस्त्र प्राण्यांचा वाढता वावर पाहता ग्रामस्थ आणि शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. यामुळे शेतीची कामे देखील खोळंबत आहेत. हिंस्त्र प्राण्यांना तातडीने जेरबंद करून त्यांचे स्थलांतर करावे, तसेच शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी माजी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे.