जळगाव पुढारी वृत्तसेवा : मित्रांसोबत फोटो काढण्यासाठी कांताई बंधाऱ्याच्या परिसरात गेलेल्या जळगाव शहरातील एका तरुणाचा या बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील वानखेडे सोसायटी (साईबाबा मंदिराजवळ) भागातील रहिवाशी असलेला शुभम कांतीलाल चव्हाण (२०) अशी तरुणाची ओळख पटली आहे. तो त्याच्या अन्य चार – पाच मित्रांसोबत फोटो काढण्यासाठी कांताई बंधारा परिसरात गेला होता. मित्रांची मस्करी चालू असताना त्यापैकी २ जण पाय घसरून पाण्यात बुडाले होते. यापैकी एकाला या मित्रांनी वाचवले, मात्र शुभमचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.