जळगाव : सैन्य दलाचे प्रशिक्षणासाठी रवाना होत असताना पंकजला शौर्याचा टिळा लावताना आई सुरेखा देशमुख. (छाया: चेतन चौधरी)  
उत्तर महाराष्ट्र

जळगाव : मोठ्या भावाचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहान भाऊही झाला सैन्यदलात भरती

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावाचा सुपुत्र यश देशमुख हे देशसेवा करत असताना दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी श्रीनगर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. दरम्यान, मोठ्या भावाचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहान भाऊ देखील सैन्यदलात भरती झाला आहे. एक मुलगा शहीद झाल्यानंतर दुसऱ्या मुलालाही देशसेवेसाठी पाठवणाऱ्या या माता-पित्याच्या देशभक्तींच कौतूक सर्व स्तरातून होत आहे.

चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावतील दिगंबर देशमुख यांचा शेती व्यवसाय आहे. त्यांच्या परिवारात दोन मुले व पत्नी असे सदस्य आहेत. मोठा मुलगा यश हा सैन्य दलात भरती झाल्यावर देशसेवा करत असताना जम्मू काश्मीर येथील हल्यात शहीद झाला. या घटनेनंतर संपूर्ण चाळीसगाव परिसरात शोककळा पसरली होती. घरातील कर्त्या मुलाचा मृत्यु झाल्यानंतर कदाचित कोणतीही माता आपला दुसरा मुलाला देशसेवेसाठी सहजासहजी तयार होणार नाही. मात्र, मोठ्या मुलाचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरेखा देशमुख या आईने लहान मुलगा पंकज देशमुख याला देखील सैन्य दलात भरती होण्यास प्रेरीत केले. पालकांच्या प्रेरणने आणि मोठया भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धाकटा देखील देशसेवेसाठी सज्ज झाला आहे.

कंपनीतील नोकरी नाकारुन सैन्यात भरती…
पंकजच्या आईने काळजावर दगड ठेवत पहिल्या मुलाच्या पाठोपाठ दुसरा मुलगा पंकजला देखील देशाच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या पंकजला इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर अनेक कंपन्यांकडून चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर्सही मिळाल्या. मात्र, मोठ्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्य दलात जाण्याचा त्याने निर्णय घेतला. तो सैन्य दलात भरती होऊन कामावर रुजू सुध्दा झाला आहे.

देशप्रेमाचा आदर्श…
शहीद यश देशमुख यांचे प्रशिक्षण ज्या ठिकाणी झाले होते. त्याच बेळगावात पंकज देशमुख सैन्य दलाचे प्रशिक्षण घेणार आहे. या प्रशिक्षणासाठी पंकज नुकताच बेळगावला रवाना झाला आहे. आई सुरेखा देशमुख यांनी पहिल्या मुलाच्या पाठोपाठ दुसऱ्या मुलालाही देशासाठी समर्पित केल्याने वीरमाता सुरेखा देशमुख यांनी आजच्या पिढीला देशप्रेमाचाही मोठा आदर्श निर्माण केला आहे.

देश सेवेचे स्वप्न पूर्ण होणार…
परिवारातील एक मुलगा शहीद झाला असताना दुसरा मुलगा देखील देशाच्या सेवेसाठी सुपूर्द करणाऱ्या परिवाराचा गर्व आणि अभिमान असल्याचेही पंकज यांनी म्हटले आहे. मोठा मुलगा यश हा शहीद झाल्यानंतर त्याचं देश सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसरा मुलगा सुद्धा भारत मातेच्या सेवेसाठी सज्ज आहे. एक मुलगा शहीद झाला असला तरी छातीवर दगड ठेऊन देशासाठी निर्णय घेत असल्याचे वीर माता सुरेखा देशमुख यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT