उत्तर महाराष्ट्र

जळगावात आयपीएलवर सट्टा ; तिघांवर कारवाई

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा : सध्या सुरू असलेल्या इंडियन क्रिकेट लीग या स्पर्धेसाठी सट्टा घेणार्‍या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी 90 हजार 600 रुपयांच्या रोकड सह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सध्या इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल ही स्पर्धा सुरू आहे. विविध ठिकाणी आयपीएल स्पर्धेबाबत सट्टा खेळला जात असल्याच्या घटना याआधी देखील मोठ्या प्रमाणात उघड झालेल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर, जळगावातही आयपीएलवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळालेली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिथा, सपोनि किशोर पवार, महेश महाले, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सचिन पाटील, योगेश भारी यांच्या पथकाने एमआयडीसीच्या फातिमा नगर भागात छापा टाकला.

यावेळी सुरु असलेल्या पंजाब विरुद्ध हैदराबाद या क्रिकेट मॅचवर गुरु ॲपच्या माध्यमातून इम्रान अमीन खान (वय ४०, रा. चिखली, ह. मु. फातेमानगर), वसीम सय्यद कमरोद्दीन (वय ३८), जावेद नबी शेख (वय ३०, रा. फातेमानगर)  हे तिघे जण बॅटिंग व बॉलिंगचे भाव माहिती करून त्यावर सट्टा बेटींग करीत असताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 40 हजार 600 रुपयांची रोख रक्कम, तीस हजार रुपये किमतीचे 5 मोबाइल,  25 हजार रुपयांचा टीव्ही, एक रजिस्टर असा एकूण 95 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पथकात जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार, मीनल साकळीकर, महेश महाले यांच्यासह एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सचिन पाटील, योगेश बारी यांचा समावेश होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक इम्रान सय्यद तपास करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT