जळगाव; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. गिरीश महाजन यांच्या घरातही पदे आहेत, त्यांच्या पत्नी साधना महाजन या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य व नगराध्यक्ष कशा राहतात? दुर्दैवाने गिरीश महाजन यांना मुलगा नाही, नाहीतर कदाचित तो देखील राजकारणात आला असता, असे विधान एकनाथराव खडसे यांनी केलं आहे.
गिरीश महाजन यांनी नंदुरबार येथे एकनाथ खडसे यांच्यावर सर्व पदे घरात पाहिजेत, अशी टीका केली होती. गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधत एकनाथ खडसे यांनी त्यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. या प्रत्युत्तरावेळी खडसेंनी केलेल्या वक्तव्याची खूप चर्चा होत आहे. गिरीश महाजन हे कसे विसरतात की त्यांनी २५ वर्षे एकाच घरात पदे ठेवली आहेत. ती पदे दुसऱ्याला द्यायला हवीत.
भाजपमध्ये घराणेशाही असलेल्यांची संख्या मोठी असून नारायण राणे, देवेंद्र फडणवीस हे देखील घराणेशाहीमधून आले आहेत. त्यांना हा नियम लागू नाही का? एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोट आपल्याकडे आहेत याचा विचार गिरीश महाजन यांनी करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातून उमेदवारी विरोधात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळण्यात आली असून आमदार मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर एकनाथराव खडसे म्हणाले की, सत्तेचा दुरुपयोग करून घाणेरडे राजकारण सुरू आहे. मात्र आम्ही ठरविले आहे की, आता या निवडणुका लढवणारच आहोत. त्यांना दाखवूनच देवू की तालुक्यात काय चित्र आहे, असे म्हणत खडसेंनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना आव्हान दिले आहे.
हेही वाचा