उत्तर महाराष्ट्र

जळगाव : उच्चांकी भाव मिळाल्याने केळीउत्पादकांमध्ये आनंद

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना सद्यस्थितीत अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा सावरत आहे. जळगाव जिल्ह्यात केळीला उच्चांकी दर मिळत असून येथील केळीला संपूर्ण देशभरात मोठी मागणी आहे.

दरवर्षी हिवाळा ऋतुत केळीदरात मोठी घसरण होत असल्याचे चित्र असते. अगदी उत्पादन खर्चही यामध्ये निघेनासा हाेतो. गेल्या वर्षी  देखील याच काळात केळीचे दर तीनशे ते साडेतीनशे रुपये क्विंटल राहिल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नव्हता. त्यामुळे केळीउत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागले. यंदा मात्र थंडीचे प्रमाण कमी असल्याने त्याचबरोबर इतर राज्यातही केळीचे उत्पादन कमी झाल्याने आणि जळगाव जिल्ह्यातील केळीला देशभरात मोठी मागणी निर्माण झाली आहे. परिणामी येथील केळीला यंदा उच्चांकी भाव मिळत आहे.

केळीउत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण
यंदा कधी नव्हे तो हिवाळ्यात एक नंबर निर्यातक्षम केळीला 2500 रुपये तर दोन नंबर केळीला 1500 ते 1800 इतका उच्चांकी भाव मिळाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र केळीवरील वाढता उत्पादन खर्च पाहता आणि संकट पाहता याप्रमाणेच वर्षभर केळीला भाव मिळायला हवा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जात आहे.

जळगावातील केळीची चवच न्यारी…
तामिळनाडू आणि गुजरातपाठोपाठ जळगावमध्ये केळीचे उत्पादन घेतले जाते. केळी हे मध्यम तापमानाच्या दमट हवामानाचे पीक म्हणून ओळखले जात असले तरी जळगाव जिल्ह्यात तापी नदीच्या काठी येणारी केळी कोरड्या हवामानात येते. येथील तापमानही 40 अंशापेक्षा जास्त असते. तापी खोर्‍यातील काळी माती व शेणखताचा होणारा वापर यामुळे येथील केळीला इतर ठिकाणच्या केळींपेक्षा जास्त गोडवा आहे आणि हा गोडवाच येथील केळींचे आकर्षण वाढवणारा आहे. काळी माती, उष्ण तापमान व शेणखताचा वापर यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळीची चव इतर कोणत्याही केळीपेक्षा वेगळी आहे. त्यामुळेच संपूर्ण देशात केळीच्या व्यापारात तिसऱ्या स्थानी असलेल्या महाराष्ट्रातील 67 टक्के केळी केवळ जळगाव जिल्ह्यात पिकते आणि 2400 कोटी रुपयांचे उत्पन्न या भागातील शेतकऱ्यांना मिळवून देत असते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT