जळगाव पुढारी वृत्तसेवा : आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असून सर्वच विभाग शासनाने दिलेले वर्षभराचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. परंतु गेल्या सप्ताहात चोपडा तहसील कार्यालयात तलाठ्यास १० हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटकेची कारवाई करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच आज मंगळवार (दि. २२) सकाळी यावल तालुक्यातील मालोद येथे तलाठी कार्यालयातील कोतवाल जहांगीर बहादूर तडवी यास तक्रारदाराच्या सात-बारा उताऱ्या वरील बहिणीचे नाव कमी करण्यासाठी ५ हजारांची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून अटक केली. यासोबतच तडवी यास मदत करणारा खाजगी दुकानदार मनोहर दयाराम महाजन यास अटक करण्यात आली असून यासंदर्भात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांची सावखेडा सीम ता. यावल येथे गट क्र. २८१ मध्ये, १ हेक्टर २१ आर शेत जमीन आहे. त्यांच्या सात-बारा उताऱ्यावर इतर हक्कात असलेले कमलबाई नामक बहिणीचे नाव मंडळ अधिकारी कमी करून देणार आहेत. असे सांगून कोतवाल जहांगीर तडवी याने किनगाव मंडळ अधिकारी यांच्या नांवाने तक्रारदाराकडे ५ हजाराची मागणी केली होती. याची तक्रार जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली. त्यानुसार जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त पथकाने किनगाव मंडळ अधिकारी कार्यालयाच्या जवळच विद्या जनरल स्टोअर खाजगी दुकानाजवळ सापळा लावून कोतवाल जहांगीर तडवी यास व त्याच्या सांगण्यानुसार रक्कम स्वीकारली म्हणून खाजगी दुकानदार मनोहर दयाराम महाजन या दोघांनाही तक्रारदाराकडून ५ हजाराची लाच घेतांना अटक केली.
पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो. हे. कॉ. अशोक अहीरे, सुनिल पाटील, शैला धनगर, पो. ना. मनोज जोशी, जनार्दन चौधरी, पो. कॉ. प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, प्रदिप पोळ यांच्या पथकाने पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.