जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी रात्री दोन गटात दंगल होवून दगडफेक झाली. त्यानंतर काल बुधवारपासून ते आज शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पाळधी गावात संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील सर्व व्यवहार बंद असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. या दंगलीत ४ जण जखमी झाले असून शंभर जणांवर दाखल दोन गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत ५८ जणांना अटक करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिस दलाकडून देण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री पाळधी गावातील एका धार्मिक स्थळाजवळून पायी दिंडी जात असताना त्यांच्यावर अचानक दगडफेक झाली. या घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर काही जणांनी पाळधी पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत असतांनाच अचानक गावात दोन गटांमध्ये दगडफेक सुरु झाली. यात पंचायत समिती सदस्याच्या वाहनाची सुध्दा तोडफोड केला. त्यामुळे प्रचंड तणाव वाढला होता. काहींनी तर दुकानांची तोडफोड करून त्यातील सामान बाहेर काढून चोरून नेले. या घटनेत पोलीसासह ४ जण जखमी झालेत. मात्र, वेळीच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शांतता प्रस्थापीत झाली आहे.
दरम्यान, प्रशासनाने गावात आज शुक्रवारी सकाळपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, गावात तणावपूर्ण शांतता असून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही तपासून बुधवारी धरपकड करीत दोन्ही गटातील एकूण ५८ संशयितांना अटक केली आहे.
हेही वाचा :