जळगाव पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नंदगाव-फेसर्डी ग्रामपंचायतीत ग्रामसेवक नसल्याने विकास कामे ठप्प झाली असून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीस कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्यात यावा, या मागणीसाठी लोकनियुक्त सरपंच, महिलांसह ग्रामस्थांनी जळगाव पंचायत समितीस घेराव घालत ठिय्या आंदोलन केले.
येथून जवळच असलेल्या नंदगाव-फेसर्डी ग्रामपंचायतीस गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामसेवक देण्यात आलेले नाहीत, त्यामुळे गावातील विविध विकास कामे ठप्प असून नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
गावात सव्वाशे कोटींची कामे मंजूर असूनही ग्रामसेवका अभावी ती ठप्प आहेत. लोकनियुक्त सरपंचांनी मंजुरी मिळालेली कामे अपूर्ण कशी राहतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. ग्रामपंचायत रेकॉर्ड देखील तपासणीच्या नावाखाली जमा करून घेतले आहे. लोकनियुक्त सरपंचांना अपात्र करण्यासाठी देखील सूडबुद्धीने अहवाल तयार करण्यात आला असल्याचा आरोप सरपंच भूषण पवार यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे.
नंदगाव-फेसर्डी ग्रामपंचायतीस कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्यात यावा व गावाचा विकास वंचित राहू नये यासाठी ग्रामस्थांतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सरपंच भूषण पवार, विठ्ठल जंगलू भिल, रतिलाल मन्साराम पाटील, रिंकू चंद्रकात पाटील, चंद्रभान कौतिक सोनवणे, रिंकू पाटील, मनीषा साळुंके, राधिका पाटील, रुपाली सोनवणे, पूनम धनगर, स्वाती सोनवणे आदी सहभागी झाले आहेत.