धुळे, पुढारी वृत्तसेवा : हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याचा उत्साह आज (शनिवार) धुळे शहरात ठिकठिकाणी दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या उद्रेकामुळे हिंदू नववर्ष स्वागत समितीचे कार्यक्रम होऊ शकले नव्हते. पण यावर्षी आता कोरोनाचा उद्रेक थांबल्यामुळे धुळ्यात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येत आहे. या निमित्ताने अनेक ठिकाणी सार्वजनिक गुढी उभारण्यात आली असून सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदू नववर्षानिमित्त आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात आज भाविकांची दर्शनासाठी रीघ होती. तर नेहमीप्रमाणे शहरातील प्रमुख चौकांमध्ये सार्वजनिक गुढी उभारून कार्यकर्त्यांनी आपला उत्साह दाखवला. धुळे शहरातील महानगरपालिका चौकात माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते सार्वजनिक गुढीचे पूजन करण्यात आले. यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर प्रदीप करपे , नगरसेवक हिरामण गवळी व हर्ष रेलन तसेच यशवंत येवलेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सार्वजनिक गुढीचे पूजन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या नावाने घोषणाबाजी करत हिंदू नववर्षाचे स्वागत केले. तर देवपुरातील श्री एकवीरा देवी मंदिरात देखील सार्वजनिक गुढी उभारण्यात आली. या गुढीचे विधिवत पूजन मंदिर ट्रस्टचे गुरव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. नेहरूनगर चौकामध्ये माजी नगरसेवक कैलास चौधरी यांनी देखील सार्वजनिक गुढीचे पूजन केले.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा उद्रेक असल्यामुळे सार्वजनिक उत्सवांवर प्रशासनाने बंदी घातली होती. मात्र, यंदा कोरोनावरील प्रतिबंध शासनाने उठवल्यामुळे आज गुढीपाडव्याचा उत्साह द्विगुणित होत आहे. हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आज सायंकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन महापौर प्रदीप करपे, स्थायी समिती सभापती शितल नवले तसेच संजय बोरसे, राजेंद्र खंडेलवाल आदींनी केले आहे. त्यानुसार या शोभायात्रेची जोरदार तयारी करण्यात येते आहे.
हेही वाचलंत का ?