जळगाव : प्रतिनिधी : शेतकरी हा देशाच्या विकासाचा कणा असून शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन तसेच प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहनाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ पोलीस कवायत मैदानावर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंमलात आणली. या योजनेतून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली आहे. तर कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरीत करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषि पंपाच्या वीजबिलात सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रथमवर्षी सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास वीज बील कोरे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कृषिपंप ग्राहकाने चालू बिल भरणे आवश्यक आहे. निसर्गाचीही अवकृपेमुळे अतिवृष्टी, पूर, गारपीटचा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना फटका बसला. राज्य शासन शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी धावून आले. जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे मदत करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या विकासात बाधा निर्माण न होता प्रगती अविरतपणे सुरू ठेवल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक करुन जिल्हावासियांचे आभार मानले.
येथील पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर राष्ट्रगीत झाले. यानंतर पालकमंत्री ना. पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना त्यांच्या जागेवर जाऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहण समारंभानंतर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा नियोजन अधिकार प्रतापराव पाटील, जळगाव शहर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सौ. गिरासे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, शासकीय आरोग्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सरिता खाचणे आणि अपूर्वा वाणी यांनी केले.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.