धुळे : "फिट धुळे, हिट धुळे" या थीमवर आयोजित मॅरेथॉन स्पर्धा-2023 च्या सिझन मध्ये दौड मध्ये सहभागी धुळेकर.  (छाया : यशवंत हरणे) 
उत्तर महाराष्ट्र

पालकमंत्री गिरीश महाजन : निरोगी शरीरासाठी नियमितपणे व्यायाम आवश्यक; धुळे मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

अंजली राऊत

धुळे : पुढारी वृत्तसेवा

भारत हा तरुणांचा देश असून तरुण सुदृढ राहिला तर देश बलवान होतो. याकरीता प्रत्येक तरुणाने शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे. धुळे पोलीस दल तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्रशासन, महापालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे मॅरेथॉनचा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास व पंचायत राज आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

धुळे जिल्हा पोलीस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॅरेथॉन स्पर्धा 2023 च्या सिझन 1 "फिट धुळे, हिट धुळे" ही थीम घेऊन शहरात प्रथमच आयोजित करण्यात आली होती. शहरातील पोलीस कवायत मैदान येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. येथील पोलीस कवायत मैदानावर रविवारी, दि. 5 सकाळी धुळे मॅरेथॉनचे उद्घाटन पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आले. याप्रसंगी आमदार जयकुमार रावल, आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळा गावीत, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, उपमहापौर नागसेन बोरसे, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.ऋषीकेश रेड्डी, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजेते विजय चौधरी, धुळे महानगरपालिकेच्या ब्रँड अँबेसिडर मृणाल गायकवाड यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरीक व खेळाडू उपस्थित होते.

या स्पर्धेत 21 किलोमीटर फूल मॅरेथॉन, 10 किलोमीटर हाफ मॅरेथॉन, 5 किलोमीटर ड्रीम रन आणि 3 किलोमीटर फॅमिली रन चार विभागात आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेस पहाटे पाच वाजेपासूनच नागरीकांनी पोलीस कवायत मैदान येथे गर्दी करण्यास सुरुवात केली होती, युवक, युवती, महिला, गृहिणी, तरुण, ज्येष्ठ नागरीक तसेच कुटुंबीय मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. पोलीस कवायत मैदानापासून सुरू झालेली मॅरेथॉन स्पर्धेचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आग्रा रोड, पाच कंदील, कराची वाला खुंट, गांधी पुतळा, नेहरू चौक, दत्त मंदिर चौक, स्टेडियम तसेच मेहरगाव पासून पुन्हा पोलीस कवायत मैदान असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. या मॅरेथॉन स्पर्धेत धुळे जिल्ह्यासह जळगाव, नाशिक, नंदुरबार, नगर, अमरावती, मुंबई आदि जिल्ह्यातील स्पर्धकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अन पालकमंत्री यांनीही धरला ठेका…
मॅरेथॉन स्पर्धेनिमित्ताने पोलीस कवायत मैदानावरील मंचावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कलाकारांनी झुंबा नृत्य केले. संगीताच्या तालावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार जयकुमार रावल यांच्यासह मंचावरील मान्यवरांनी देखील ताल धरला.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT