उत्तर महाराष्ट्र

वणीच्या सप्तशृंगी देवीचे हुबेहूब रूप असलेली ‘सांडव्यावरची देवी’ ; कुठे? जाणून घ्या आख्यायिका

गणेश सोनवणे

नाशिक : गणेश बोडके

देवीच्या साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धे पीठ समजल्या जाणार्‍या जिल्ह्यातील वणीच्या सप्तशृंगी देवीचे हुबेहूब रूप म्हणजे शहरातील गोदाकाठी वसलेली सांडव्यावरची देवी. तब्बल पावणेतीनशे वर्षांपूर्वी या मंदिराची उभारणी झाल्याचे सांगितले जाते. भाविकांच्या मनाला प्रसन्न करणारी 18 भुजाधारी देवी नवसाला पावणारी म्हणूनही भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराच्या निर्मितीला आख्यायिका आहे. जाणून घेऊया…

देवी मंदिरात पाचव्या माळेला करण्यात आलेला जागरण गोंधळ

पेशव्यांचे सरदार नारोशंकर राजेबहाद्दर हे वणीच्या जगदंबेचे परमभक्त होते. घोड्यावरून रोज ते वणीला दर्शनासाठी जात असत. पुढे वार्धक्यामुळे त्यांना दर्शनाला जाणे शक्य होत नसे. त्यावेळी त्यांनी जगदंबेला साकडे घातले. यानंतर देवीने त्यांना साक्षात्कार दिला व मीच तुझ्या घरी येईन, असा आशीर्वाद दिला. फक्त मी येत असताना तू मागे वळून पाहायचे नाही. तू ज्या ठिकाणी मागे वळून पाहशील. त्याच ठिकाणी मी स्तब्ध होईल, अशी अट देवीने त्यांना घातली. नारोशंकरजींचा घोड्यावर प्रवास सुरू झाला आणि त्या पाठोपाठ देवीही होती. प्रवास सुरू असताना देवीच्या पैंजणांचा आवाज येत होता. परंतु, सरदार चौकात येताच आपणच बांधलेल्या मंदिरात नारोशंकर यांना महादेवाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. ते दर्शनासाठी वळले आणि देवीच्या घुंगरांचा आवाज बंद झाला. आवाज का बंद झाला, हे पाहण्यासाठी नारोशंकरजी वळले आणि देवी तेथेच स्थानापन्न झाली. तेच हे ठिकाण म्हणजेच सांडव्यावरची देवी, असे सांगतिले जाते. नवरात्रनिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गडावरील सप्तशृंग देवीचे दर्शन घेतल्यानंतर सांडव्यावरच्या देवीचेही दर्शन घेण्याची परंपरा आहे. या मंदिरासमोर मोठी लक्षवेधी दीपमाळही उभारलेली आहे. या मंदिरात पंचमीला गोंधळाचा कार्यक्रम होतो. अष्टमीच्या दिवशी होम व महापूजा करण्यात येते. आजही सरदार नारोशंकर राजेबहाद्दरांची अकरावी पिढी या मंदिराचा कारभार उत्तमरीत्या सांभाळत आहे.

वीरासनात बसलेल्या या मूर्तीने आजवर अनेक पूर, महापूर अनुभवले आहेत. पूर आल्यानंतर देवी मूर्ती पाण्याखाली जाते. त्याचमुळे या मूर्तीच्या मूळ गाभ्यापर्यंत ओलावा कायम राहतो. मूर्तीवर नैसर्गिक गोष्टींचा होणारा थेट परिणाम यामुळे तिचे जतन व संवर्धन अत्यंत गरजेचे झाले होते. त्यामुळे गेल्याच महिन्यात नाशिकच्या मिट्टी फाउंडेशनचे अध्यक्ष व मूर्तिकार मयूर मोरे यांनी कोणत्याही प्रकारचे हानिकारक व कृत्रिम पदार्थांचे लेपण न करता अत्यंत बारकाईने व अभ्यासपूर्ण रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली आहे. मूर्तीच्या मूळ रचनेला कोणताही धक्का न लावता व कोणत्याही प्रकारची पृष्ठभागाची हानी न करता ही प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली आहे. हे संवर्धनाचे काम बारा दिवस चालले होते. या प्रक्रियेत मूर्तीच्या मूळ गाभ्यापर्यंत जाऊन पक्केपणा देणार्‍या रसायनांचा वापर करून व त्यामधील गॅस्ट्रिक क्रिएशन संथ होऊन मूर्तीला अधिक बळकटी मिळत आहे. त्यामुळे देवीचे रूप अधिकच खुलले आहे. अत्यंत मोहक आणि लोभस रूप असलेल्या जगदंबेचे वीरासनात बसलेल्या अवस्थेतील हे एकमेव मंदिर मानले जाते.

'स्मार्ट' झळाळीची प्रतीक्षाच :

प्राचीन मंदिरांप्रमाणे याही मंदिराचा व मंदिर परिसराचा विकास होणे गरजेचे आहे. शहर स्मार्ट होत असले, तरी शहरातील मंदिरांकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. मंत्रनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कुंभनगरीतील प्राचीन मंदिरांचा वारसा जोपासणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, गेली अनेक वर्षे याकडे कोणाचेच लक्ष नसल्याची खंत भाविक व्यक्त करीत आहेत. स्मार्ट सिटीच्या वतीने प्रोजेक्ट गोदा अंतर्गत गोदाघाटाचा विकास होत असताना गोदाकाठावरील अशा मंदिरांनाही 'स्मार्ट' झळाळी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT