नाशिक (मनमाड) प्रतिनिधी : भोंग्याच्या वादात आरपीआयने उडी घेतली असून, राज ठाकरे हे हुकूमशाही करत असल्याचा आरोप करत बुधवारी (दि.4) मनमाडला आरपीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र आहिरे, जिल्हा उपाध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली भोंग्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढला.
हा मोर्चा शहरातील नगीना मशीदजवळ आल्यानंतर येथे कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून मशिदीचे संरक्षण केले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून मंडल आणि पोलिस अधिकार्यांना निवेदन दिले. त्यात राज ठाकरे हे भोंग्याचा मुद्दा उपस्थित करून राज्यात आणि देशात अशांतता माजवीत आहे त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी कैलास अहिरे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, पी. आर. निळे, रूपेश अहिरे, अॅड. प्रमोद अहिरे, महेंद्र वाघ, दिनकर कांबळे, शेखर अहिरे, प्रशांत दराडे, नाना अहिरे, अकिल शेख, कमल खरात, अरुणा जाधव, कृष्णा पगारे, सुधीर शाहू आदी उपस्थित होते.
मनसे कार्यकर्त्यांची धरपकड
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने मनमाडला पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करून शहराध्यक्ष सचिन सिरुड यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या सर्वांना पोलिस स्थानकात आणल्यानंतर त्यांना कोणतीही गडबड झाली तर तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल, अशी समजवजा नोटीस देऊन सोडून देण्यात आले. दरम्यान, शहरातील सर्व मशिदींच्या विश्वस्तांनी लाउडस्पीकरची परवानगी घेतलेली असून, अजान देताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती जामा मशिदीचे मौलाना अस्लम रिजवी यांनी दिली.