उत्तर महाराष्ट्र

अवकाळीचा दणका : बळीराजा हतबल ; द्राक्षाच्या गुणवत्तेवर परिणाम

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे काढणीला आलेले लाल कांदे, गहू, हरभरा या पिकांबरोबरच द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. आधीच लांबलेल्या थंडीमुळे यंदा अपेक्षित दर मिळत नसताना या अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे.

नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस कोेसळत आहे. यात दिंडोरी, चांदवड व निफाड तालुक्यातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. सध्या रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून, लाल कांद्याची काढणी सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे काढणी केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. द्राक्षाच्या या हंगामात उत्पादकांना तीन वेळा अवकाळी पावसाचा सामना करावा लागला आहे. छाटणीच्या वेळी हवामानातील बदलामुळे घडकुजीचा सामना करावा लागल्यानंतर डिसेंबर व जानेवारीत सलगपणे अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचा औषध फवारणीचा खर्च वाढला.

वाढलेली महागाई, द्राक्ष, कांद्याचे पडलेले दर यामुळे शेतकरी त्रस्त असताना अवकाळी पावसाच्या संकटाने त्यावर आणखी प्रहार केला आहे. सततचे अस्मानी संकट सहन करण्याची शेतकर्‍यांची क्षमता आता संपली असून, द्राक्ष उत्पादक शेतकरी आता या पिकापासून दूर जाऊ लागला आहे.
– डॉ. वसंत ढिकले, द्राक्ष उत्पादक शेतकरी

द्राक्षाच्या गुणवत्तेवर परिणाम
आता द्राक्षबागांचा काढणी हंगाम ऐन भरात आहे. यामुळे पुरता द्राक्षउद्योग धाराशाही पडल्याची भावना उत्पादकांमधून व्यक्त होत आहे. निफाड तालुक्यात काही ठिकाणी रात्री गारपीटही झाली आहे. यामुळे द्राक्षघडांना त्याचा थेट फटका बसून शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. तीन दिवसांपासून पाऊस व ढगाळ हवामान यामुळे द्राक्षघडांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. आधीच द्राक्षांचे भाव पडले असून, त्यात या पावसामुळे द्राक्षाच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्यास शेतकर्‍यांना ही द्राक्षे फेकून देण्याची वेळ येऊ शकते, अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT