नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील टीम पॉइंट ब्रेक अॅडव्हेंचरने ऐतिहासिक रामशेज किल्ल्यावर जाण्यासाठी पश्चिम दिशेला आणखी एक मार्ग शोधला आहे. रामशेजवर जाण्यासाठी आशेवाडी गावातून पारंपरिक मार्ग आहे. तसेच गावाच्या उत्तरेला दुसरा मार्ग असून, त्या व्यतिरिक्तही आणखी एक मार्ग पश्चिमेला असल्याचे दुर्ग संवर्धकांनी सांगितले.
दुर्ग रामशेज गडावर घेऊन जाणारा ऐतिहासिक तिसरा पायरी मार्ग असल्याच्या काही खाणाखुणा मार्च महिन्यातील दुर्ग रामशेज गडाच्या आडवाटेच्या भटकंतीमध्ये टीम पॉइंट ब्रेक अॅडव्हेंचरचे गिर्यारोहक जॅकी साळुंके, हेमंत पाटील यांच्या लक्षात आले. हा मार्ग बरीच वर्षे दुर्गप्रेमींना अपरिचित होता. या मार्गातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने तीन पॉइंट ब्रेक अॅडव्हेंचर्सच्या गिर्यारोहक संघानेे 29 मार्च रोजी या मार्गाची मोहीम हाती घेत सुरक्षित प्रस्तरारोहण करीत दुर्ग रामशेज गडाचा माथा गाठला. या मार्गावर काही कोरीव पायर्या, त्यानंतर उद्ध्वस्त भग्नावस्थेतील मार्गातील दोन बुरुज हा ऐतिहासिक खजिना दुर्गप्रेमींसमोर आणण्याच्या प्रयत्नांना यश आले.
हा मार्ग गडाच्या पश्चिमेला आहे. या मार्गाची चढाई करण्यासाठी मध्यम श्रेणीचे काही कातळ टप्पे रोहण करीत निसरड्या वाटेने दुर्ग रामशेज गडाच्या माथ्यावर पोहोचता येते. ही मोहीम सुरक्षित व यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी टीम पॉइंट ब्रेक अॅडव्हेंचर परिवारातील गिर्यारोहक जॅकी साळुंखे, हेमंत पाटील, चेतन शिंदे, विशाल बोडके, युगंधर पवार, भूषण जाधव यांचा समावेश आहे.
तिसरा पायरी मार्ग असल्याच्या काही खाणाखुणा मार्च महिन्यातील दुर्ग रामशेज गडाच्या आडवाटेच्या भटकंतीमध्ये लक्षात आले. हा मार्ग बरीच वर्षे दुर्गप्रेमींपासून अपरिचित होता. या ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे, हाच महत्त्वपूर्ण उद्देश आहे.
– हेमंत पाटील, क्रीडाशिक्षक, दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालय, गंगापूर.