धुळे

Dhule news | शिरपूर तालुक्यातील अनेर अभयारण्यात आगीचे थैमान

वन्यजीव आणि वनसंपदा दोघींच्या अस्तित्वावर संकट

पुढारी वृत्तसेवा

सोनगीर : शिरपूर तालुक्यातील अनेर अभयारण्यात गेल्या १५ दिवसांत २ वेळा लागलेल्या आगीमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात इसमांकडून ही आग लावण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या आगीमुळे वन संपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अभयारण्यातील अनेक झाडे जळून खाख झाली आणि वन विभागाने नुकतीच लावलेली रोपे देखील नष्ट झाली आहे.

विशेष म्हणजे या घटनेमुळे अभयारण्यात वास्तव्य करणाऱ्या वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. आग लागल्यामुळे झाडांचे नुकसान तसेच वन्य प्राणी घाबरून स्थलांतर करत आहेत. दरम्यान स्थानिकांनी व वन्यप्रेमींनी वनविभागाकडे वारंवार तक्रारी करूनही योग्य ती दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. सतत घटणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आग लावणाऱ्या दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. अनेर अभयारण्यात वारंवार लागणाऱ्या आगीमुळे वन्यजीव आणि वनसंपदा दोघींच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT