Wildlife importance ecosystem | वन्यजीवांचे मोल ओळखूया!

Wildlife importance ecosystem |
Wildlife importance ecosystem | वन्यजीवांचे मोल ओळखूया!
Published on
Updated on

कावेरी गिरी

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वन्यप्राण्यांचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच देशात अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि प्राणी बचाव केंद्रे यांचे विस्तृत जाळे उभारण्यात आले आहे, तरीही वन्यजीवांच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर त्रुटी सतत उघड होत आहेत. प्रश्न असा निर्माण होतो की, वन्यजीवांचे खरे मोल आपल्याला कधी उमगणार?

अलीकडच्या काळात छत्तीसगडमधील सरगुजा जिल्ह्यातील एका प्राणी बचाव केंद्रात घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे. येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तब्बल 15 हरणांचा मृत्यू झाला. ही घटना केवळ एक अपघात नाही, तर वन्यजीव संरक्षण व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण आहे. ज्या हरणांना शिकार्‍यांपासून वाचवण्यासाठी सुरक्षित बाड्यात ठेवले होते, त्याच ठिकाणी त्यांचा अशाप्रकारे मृत्यू होणे ही बाब अत्यंत संतापजनक आहे.

या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे, कुत्र्यांचा कळप बाड्यात घुसून एकामागून एक हरणांवर हल्ला करत होता. वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी ठोस उपाय काय, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. ही एकच घटना नाही. इंदूरमधील अशाच प्रकारच्या घटना असोत किंवा महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत झालेला 119 वाघांचा मृत्यू असो, या सर्व घटनांमधून एकच गोष्ट अधोरेखित होते की, आपण अजूनही जैवसाखळीतील वन्यजीवांचे महत्त्व समजून घेतलेले नाही. वन्यजीव हे केवळ जंगलातील प्राणी नसून, ते पर्यावरणीय संतुलनाचे मुख्य घटक आहेत. प्रत्येक प्राणी, मग तो छोटा कीटक असो किंवा मोठा वाघ, आपल्या परिसंस्थेत एक विशिष्ट भूमिका बजावत असतो. वन्यजीवांची संख्या कमी होणे म्हणजे संपूर्ण परिसंस्थेचा समतोल बिघडणे होय. उदाहरणार्थ, हरणांची संख्या कमी झाली, तर त्यावर अवलंबून असलेल्या मांसाहारी प्राण्यांवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे एखाद्या प्रजातीचा नाश झाला, तर त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण अन्नसाखळीवर होतात. त्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ पर्यावरणाची गरज नसून, ती मानवी अस्तित्वासाठीही आवश्यक आहे.

भटक्या कुत्र्यांचा प्रश्नदेखील अत्यंत गंभीर आहे. शहरांमध्ये आणि गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही कुत्री केवळ वन्यजीवांसाठीच नव्हे, तर माणसांसाठीही धोकादायक ठरत आहेत. अनेकदा ही कुत्री बालकांवर, वृद्धांवर आणि महिलांवर हल्ले करतात, त्यांना जखमी करतात. काही वेळा तर अशा हल्ल्यांमध्ये जीवितहानीदेखील होते. अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनतो; परंतु कुत्र्यांना मारण्यावर कायदेशीर बंदी असल्यामुळे प्रशासनाच्या हातात मर्यादित पर्याय राहतात. त्यामुळे या समस्येवर दीर्घकालीन आणि शाश्वत उपाय शोधणे आवश्यक आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन यावर भर देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करून कुत्र्यांना मिळणारे अन्नाचे स्रोत कमी करणेदेखील महत्त्वाचे आहे.

वन्यजीव संरक्षणाच्या द़ृष्टीने पाहता केवळ कायदे करून किंवा अभयारण्ये निर्माण करून समस्या सुटत नाही. त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि व्यवस्थापन यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. वन विभागातील कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण, त्यांच्या कामकाजावर नियंत्रण आणि जबाबदारी निश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, सेन्सर प्रणाली यांचा वापर करून अभयारण्यांमधील हालचालींवर लक्ष ठेवता येऊ शकते. तसेच, वन्यजीवांच्या आरोग्याची नियमित तपासणी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी पुरेशा निधीची उपलब्धता आणि त्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे.

याशिवाय, जनजागृती हादेखील एक महत्त्वाचा घटक आहे. लोकांमध्ये वन्यजीवांविषयी सहानुभूती आणि जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. अनेकदा अज्ञानामुळे लोक वन्यजीवांना त्रास देतात किंवा त्यांच्या अधिवासाचा नाश करतात. त्यामुळे शालेय शिक्षणापासूनच पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून या संरक्षण प्रक्रियेत योगदान देऊ शकतो. प्लास्टिकचा कमी वापर, वृक्षारोपण, कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन अशा छोट्या कृती देखील मोठा फरक घडवू शकतात. आजच्या काळात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत आहे. यामुळे वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत आणि ते मानवी वस्तीच्या जवळ येऊ लागले आहेत. यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. या संघर्षाचे परिणाम दोन्ही बाजूंना भोगावे लागतात. त्यामुळे विकास आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. छत्तीसगडमधील घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते, केवळ व्यवस्था उभारणे पुरेसे नाही, तर ती प्रभावीपणे चालवणे अधिक महत्त्वाचे आहे. वन्यजीवांचे संरक्षण हे केवळ कागदोपत्री राहू नये, तर ते प्रत्यक्षातही दिसले पाहिजे.

शेवटी, वन्यजीवांचे मोल आपण ओळखले नाही, तर त्याचे परिणाम भविष्यात भयानक असू शकतात. पर्यावरणीय संतुलन बिघडल्यास त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. त्यामुळे वेळ अजून गेलेली नाही. आपण जागरूक होऊन योग्य पावले उचलली, तरच आपल्या पुढील पिढ्यांसाठी हा निसर्गसंपन्न वारसा जतन करता येईल. वन्यजीवांचे रक्षण म्हणजे आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण होय. आता तरी आपण हे समजून घेऊन कृती करणार का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news