धुळे : धुळे येथील विश्राम ग्रहातील खोली क्रमांक 102 मध्ये सापडलेल्या रोकड प्रकरणात शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी राज्य शासन आणि पोलीस प्रशासनाला इशारा दिल्यानंतर अखेर खोलीबाहेर आंदोलन करणारे माजी आमदार तथा शिवसेना नेते अनिल गोटे यांचा अदखलपात्र गुन्ह्यामध्ये जबाब नोंदवण्यात आला आहे. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी राजकुमार मोगले हा घटना घडल्यापासून 11 दिवसांपासून पोलिसांसमोर हजर झालेला नव्हता. त्याला आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर विश्रामगृहाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळलेल्या सुमारे 3 हजार फाईलची तपासणी देखील सुरू करण्यात आली आहे. दरम्यान हा तकलादु गुन्हा दाखल करण्यात आला असून यातून देश आणि राज्यातील जनतेची चेष्टा करण्यात आल्याची टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.
धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत एक कोटी 84 लाख 84 हजार रुपये आढळून आले. माजी आमदार अनिल गोटे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे सहा तास उशिराने पोहोचलेल्या पोलिस आणि महसूल विभागाच्या समितीने या खोलीच्या दरवाजाचे कुलूप कापून आज प्रवेश केला. यानंतर तब्बल चार तास खोलीत नोटा मोजण्याचे काम सुरू होते. या प्रकरणात मुंबई पोलीस कायदा कलम 173 तीन अंतर्गत प्राथमिक चौकशी लावण्यात आली. या चौकशीचा अहवाल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी सादर केला.
मात्र या अहवाला मध्ये तक्रारदार असणारे माजी आमदार अनिल गोटे तसेच आंदोलन करणारे आणि पंच म्हणून खोलीत जाणारे नरेंद्र परदेशी यांचा जबाब घेणे टाळण्यात आले. यानंतर कलम 124 अंतर्गत विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे कथित स्वीय सहाय्यक किशोर पाटील तसेच विधान परिषदेच्या माजी सदस्याचे स्वीय सहाय्यक राजकुमार व्यंकटराव मोगले यांच्यासह एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात आज उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांनी माजी आमदार अनिल गोटे यांचा जबाब नोंदवला आहे. या जवाब मध्ये खोली क्रमांक 102 मध्ये सापडलेल्या रोकड घटनेचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. विशेषता पोलीस सहा तास उशिराने आल्याचे देखील या जवाब नमूद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान कलम 124 अंतर्गत दाखल गुन्ह्यांमधील आरोपी राजकुमार मोगले हा गेले ११ दिवस आउट ऑफ रेंज होता. त्याला शोधून आज तपासात धुळे येथे आणले आहे .तसेच विश्राम ग्रह मधील सीसीटीवी फुटेज मधे एकूण ३ हजार फाईल आहेत. त्याची पाहणी पोलिसांनी चौकशीमध्ये सुरू केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
दरम्यान या गुन्ह्याच्या तक्रारीत देखील पोलिसांना मोगले यांचे ओळखपत्र देखील आढळून आले आहे. या प्रकरणात विधान मंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी या प्रकरणाशी समितीचा काहीही संबंध नसल्याचे नमूद केले असले तरीही आता किशोर पाटील यांच्या सांगण्यानुसार ही खोली दिली गेल्याचे तक्रारीत म्हटल्याने आमदार खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याचे चिन्ह तयार झाले आहे. विशेषता या खोलीला मोगले आणि संबंधितांनीच कुलूप खोकल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही तर जनतेची चेष्टा- गोटे
पोलिसांनी कलम 124 अंतर्गत दाखल केलेला गुन्हा हा तकलादू स्वरूपाचा आहे .या गुन्ह्यात तीन महिन्याची शिक्षा आणि अवघे 500 रुपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र दुचाकीच्या अपघातात देखील दहा हजारापर्यंत दंड केला जातो .एवढी मोठी रोकड सापडल्यानंतर अवघ्या पाचशे रुपये दंडाची शिक्षा असणारे कलम लावणे म्हणजे देश आणि महाराष्ट्रातल्या जनतेची चेष्टा करण्यासारखा हा प्रकार असल्याची टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.