धुळे

अब्दुल मलिक यांच्यावरील हल्यातील आरोपींना तत्काळ अटक करावी-आ.फारुख शाह यांची मागणी

गणेश सोनवणे

धुळे पुढारी वृत्तसेवा– मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या आरोपींना तात्काळ अटक करून या षडयंत्राच्या मागे कोण आहे. याचा शोध घेऊन तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी , अशी मागणी धुळ्याचे एमआयएमचे आमदार आ. फारुख शाह यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे. यावेळी या घटनेतील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच कायदा आणि सुव्यवस्था खराब करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे आश्वासन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी यावेळी दिले.

मालेगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असून परवा माजी महापौर एम आय एम चे महानगराध्यक्ष अब्दुल मलिक यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्याच्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नासिक येथे उपचार चालू आहे. या संदर्भात आता धुळ्याची एम आय एम चे आमदार फारुक शाह यांनी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन या प्रकरणात सखोल चौकशी करावी अशी मागणी केली. आ. फारुख शाह यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक कायदा आणि सुव्यवस्था खराब करण्याचे काम करीत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. दिवसेंदिवस ढासाळत असलेल्या कायदा व सुव्यवस्था संदर्भात तात्काळ या भागातील अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. व सक्षम अधिकारीची नेमणूक करण्यात यावी. या षडयंत्र च्या मागे असणाऱ्या व्यक्तींवर व मुख्य आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशी मागणी देखील यावेळी आमदार शाह यांनी केली. यावेळेस श्रीमती रश्मी शुक्ला यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल व या षडयंत्राच्या मागे असलेल्या सूत्रधारावर देखील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन आ. फारुख शाह यांना दिले आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT