Sukanya Samriddhi Yojana file photo
धुळे

Dhule News: सुकन्या समृद्धी योजनेच्या पैशांवर डल्ला; साक्रीतील दुसाने डाकघरातील धक्कादायक प्रकार उघड

Sukanya Samriddhi Yojana scam Dhule: शासनाकडून डाक विभागाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या 'सुकन्या समृद्धी योजने'ला स्वतः सहाय्यक शाखा डाकपालानेच नख लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sukanya Samriddhi Yojana scam Dhule:

धुळे: शासनाकडून डाक विभागाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या 'सुकन्या समृद्धी योजने'ला स्वतः सहाय्यक शाखा डाकपालानेच नख लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साक्री तालुक्यातील दुसाने येथील डाकघरात (पोस्ट ऑफिस) हा अपहाराचा प्रकार घडला असून, याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाच्या माध्यमातून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी तसेच महिलांना सन्मान करून देण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व राज्यात लाभ मिळत असतानाच शासनाच्या या योजनेत झारीचे शुक्राचार्य अडथळा निर्माण करीत असल्याची बाब धुळे जिल्ह्यात निदर्शनास आली आहे.

साक्री तालुक्यातील दुसाने येथील डाक घरामध्ये हा प्रकार घडला आहे. या डाक कार्यालयामध्ये आऊटसाईडर म्हणून तसेच सहाय्यक शाखा डाकपाल म्हणून राहुल नानाभाऊ करणकाळ यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी दुसाने शाखा डाक घर अंतर्गत येणाऱ्या सुकन्या समृद्धी योजना तसेच आवर्ती जमा योजनेच्या खातेदारांकडून पैसे स्वीकारले. यानंतर या पैशांची संबंधित खातेदाराच्या पासबुक वर नोंद करून डाकघराचा शिक्का मारून त्यांनी स्वतःची स्वाक्षरी केली. मात्र या खातेदारांकडून स्वीकारण्यात आलेली सहा लाख तीन हजार 761 रुपये रक्कम स्वतः स्वीकारून ही रक्कम डाक घरामध्ये जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला.

हा प्रकार 9 फेब्रुवारी 2015 ते 2 नोव्हेंबर 2022 या दरम्यान घडल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे डाकघर निरीक्षक भरत दीपक चौधरी यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम 409, 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT