धुळे : जळगाव येथील कार्यक्रमात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याचे तिव्र पडसाद धुळ्यात उमटले आहे. शिवसेनेच्या ठाकरे पक्षाने निदर्शने करीत सहकार मंत्री पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला रोष व्यक्त केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने झाशी राणी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनैकांनी बाबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली. व त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत महाराष्ट्रातल्या युती सरकारच्या बेताल वक्तव्यांच्या कारभारावर ताशेरे ओढले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, सुनील पाटील तालुकाप्रमुख बाबाजी पाटील जनार्दन मासुळे भैय्या पाटील सुकवड संजय पाटील कुंडाणे, आनंद जावडेकर, प्रशांत भामरे, कपिल लिंगायत पिनू सूर्यवंशी अजय चौधरी निलेश कांजरेकर, गुलाब धोबी, आशुतोष कोळी, शुभम फुलपगारे ,तेजस सपकाळ आदी उपस्थित होते. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या धोरणांचा निषेध केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जळगाव येथे एका अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली ,याबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेला मीठ चोळले आहे. आधीच महाराष्ट्राचा शेतकरी कर्जबाजारीपणामुळे देशोधडीला लागला असून त्यातल्या त्यात अतिवृष्टीमुळे त्याच्यावर अस्मानी संकट आले असताना शेतकऱ्यांना मदत करणे दूरच पण शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपली वैचारिकता दाखवून दिली असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.