

पिंपळनेर (धुळे) : साक्री तालुक्यातील दारखेल परिसरात पाळीव जनावरांवर बिबट्याचे हल्ले वाढले होते. बिबट्याचा लोकवस्तीतील वाढता वावर स्थानिकांसाठी चिंतेचा विषय बनला होता. संभाव्य मानव-पशु संघर्ष टाळण्यासाठी पिंपळनेर वन परिक्षेत्राद्वारे जनजागृती मोहीम तसेच आवश्यक उपाययोजना आधीच राबविण्यात आल्या होत्या.
दरम्यान, रात्री साधारण ८ वाजण्याच्या सुमारास दारखेल गावातील लोकवस्तीजवळ असलेल्या जनावरांच्या गोठ्यात एक बिबट्या अडकला असल्याची माहिती वन विभागाला मिळाली.
माहिती मिळताच, वन परिक्षेत्र अधिकारी श्री. ओंकार ढोले आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कोणतीही जीवितहानी होऊ न देता, वन कर्मचाऱ्यांनी शिताफीने आणि कौशल्याने बिबट्याला त्या ठिकाणाहून सुरक्षितपणे बाहेर काढले.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जेरबंद केलेला बिबट्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले आहे.
धुळ्याच्या वनसंरक्षक श्रीमती निनू सोमराज, उपवनसंरक्षक मो. बा. नाईकवाडी आणि सहायक वनसंरक्षक योगेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहीम पार पडली.
वनपरिक्षेत्र अधिकारी ओंकार शं. ढोले यांच्या नेतृत्वाखाली वनपाल रामदास चौरे, वनरक्षक अनिल घरटे, दिपक राठोड, वरूणराज माळी, अमोल पवार, राकेश पावरा, सुरेश पावरा, लखन पावरा, आकाश पावरा आणि वनमजूर मधुकर कुंवर, मोतीराम शिंदे, विक्रम अहीरे, उज्जैन चौधरी यांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलले.
या मोहिमेत दारखेल गावाचे सरपंच प्रभाकर भामरे, पोलीस पाटील कल्पेश भामरे, समाधान भामरे, हंसराज भामरे, अमोल खैरनार यांच्यासह जागरूक ग्रामस्थांनी वन विभागाला अमूल्य सहकार्य केले.