Shirpur Sakhar Karkhana reopening 2026
धुळे : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. (मध्यप्रदेश) यांना भाडेतत्त्वावर देण्यात आला असून, येत्या २०२६-२७ च्या गळीत हंगामात हा कारखाना सुरू होणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक असलेली अनेक कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी १० मे २०२४ रोजी शिरपूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ व जिल्हा बँक पदाधिकाऱ्यांनी हा कारखाना २० वर्षांच्या कालावधीसाठी माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. (म.प्र.) यांना भाडेतत्त्वावर दिला होता. त्या वेळी कायदेशीर नोटरी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. मात्र, शासनस्तरावर अधिकृत नोंदणीसाठी विविध तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने प्रक्रिया रखडली होती.
दरम्यान, सर्व तांत्रिक अडथळे दूर होऊन ३० जानेवारी २०२६ रोजी शासनदरबारी अधिकृत रजिस्ट्रेशन पूर्ण झाले. नियमाप्रमाणे संपूर्ण स्टॅम्प ड्युटी भरून माँ-रेवा कंपनीसोबत करारनामा अंतिम करण्यात आला आहे. यापूर्वी न्यायालयीन प्रक्रिया, कारखान्याच्या जमिनीची मोजणी तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला होता.
शिरपूर येथील जनक विला येथे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माँ-रेवा कंपनीचे संचालक अंकित गोयल, जिल्हा बँक सीईओ मनोज चौधरी, कारखान्याचे अध्यक्ष माधवराव पाटील व उपाध्यक्ष दिलीपभाई पटेल यांच्या उपस्थितीत रजिस्ट्रेशनची कागदपत्रे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली.
तसेच, माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत साखर कारखाना संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीस अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीपभाई पटेल यांच्यासह संचालक के. डी. पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश चौधरी, डी. पी. माळी, राहुल रंधे, वासुदेव देवरे, संग्रामसिंग राजपूत, भरत पाटील, बन्सीलाल पाटील, धनंजय पाटील, नारायणसिंग चौधरी, जयवंत पाडवी, सौ. मंगला परेश दोरिक, सौ. सुचिता विजय पाटील तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर प्रत्यक्ष साखर कारखाना परिसराची पाहणी करण्यात आली. पुढील हंगामात कारखाना सुरू करण्याबाबत माँ-रेवा कंपनीचे जनरल मॅनेजर गणेश यादव यांनी सविस्तर माहिती दिली.
माँ-रेवा कंपनीचे संचालक अंकित गोयल यांनी सांगितले की, शिरपूरचा हा त्यांचा आठवा साखर कारखाना असून यापूर्वी त्यांनी सात साखर कारखाने यशस्वीपणे चालविले आहेत. त्यांच्या कारखान्यांमध्ये इथेनॉल व वीज निर्मितीवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला असून, मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून शिरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस दुर्गा खांडसरी व ठिकरी (मध्यप्रदेश) येथील या कंपनीच्या कारखान्यांकडे पाठवत होते. आता शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू होणार असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.