Ramdas Athawale Pudhari
धुळे

Ramdas Athawale | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयाला मदतीसाठी प्रयत्नशील : रामदास आठवले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयात सुवर्ण महोत्सव सोहळा आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

पुढारी वृत्तसेवा

Ambedkar Law College Dhule

धुळे : धुळे येथील शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयात सुवर्ण महोत्सव सोहळा आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, महापौर मायादेवी परदेशी, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, उपमहापौर ज्योत्सना पाटील, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, वेस्ट खान्देश दलित शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र निळे, सचिव शशिकांत पाटील, सीडीसी सदस्य अॅड. जितेंद्र निळे, प्राचार्य डॉ. विजय बहिरम आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांवर आधारित शिक्षण देण्याचे काम हे महाविद्यालय अनेक वर्षांपासून करत आहे. विधी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांची जपणूक होत आहे. या महाविद्यालयातून अनेक गुणवंत विधीज्ञ घडले असून काही विद्यार्थी न्यायाधीश पदापर्यंत पोहोचले आहेत.

देशात आणि राज्यात वकिलांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वकिली व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी महानगरपालिकेमार्फत जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येतील. तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून संस्थेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, सामाजिक न्याय, समता आणि बंधुभाव या मूल्यांच्या प्रसारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने रावसाहेब अशोक निळे यांनी या संस्थेची स्थापना केली. आज संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण झाली असून या महाविद्यालयातून देशाला अनेक सक्षम वकील आणि न्यायाधीश मिळाले आहेत. खानदेशासह देशभरात विधी शिक्षणाचा प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संस्थेने केले आहे.

केंद्र सरकार “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या ध्येयाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी कार्य करत असून विधी महाविद्यालयाच्या विस्तारासाठी तसेच संस्थेला आवश्यक निधीसाठी मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, संस्थेचे अध्यक्ष महेंद्र निळे, प्राचार्य डॉ. विजय बहिरम तसेच माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT