छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आमदार अनुप अग्रवाल व भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष Pudhari Photo
धुळे

Dhule News | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला विरोध : अनिल गोटे यांचा अर्ज फेटाळला

आमदार अनुप अग्रवाल व भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे येथील मनोहर चित्र मंदिरा जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बांधकामा संदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी दाखल केलेला निशाणी क्रमांक पाचचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामासंदर्भात महानगरपालिका आणि संबंधित प्रतिवादींचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले आहे.

धुळे येथे मनोहर चित्रमंदिर जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्या नजीक पूर्णाकृती पुतळ्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या पुतळ्याचा चबुतऱ्याचे काम सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार होत नसल्याचा आक्षेप घेत माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला. या दाव्या संदर्भात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दिवाणी न्यायाधीश चव्हाण यांनी निशाणी क्रमांक पाचचा अर्ज फेटाळून लावला. या कामास स्थगिती दिल्यास प्रतिवादी गटाचे नुकसान होऊ शकते, असे निरीक्षण देखील न्यायालयाने नोंदवले. हा निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार अनुप अग्रवाल यांच्या सह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याजवळ जल्लोष केला.

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की,मी आमदार झाल्यापासून शहरात सुरू असलेल्या विकासकामांना विरोध करण्याचे, खास करून छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोधाचे कारस्थान करत उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने त्यांना सणसणीत चपराक बसली आहे. यामुळे आता रयतेचे राजे असलेल्या छत्रपतींचे स्मारक मोठ्या उत्साहाने, दिमाखदारपणे भव्य स्वरूपात पूर्ण होईल. उबाठाच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आता जनताच उत्तर देईल. विरोधकांना आणखी कुठे जायचे असेल तर खुशाल जावे, असे आव्हान आमदार अनुप अग्रवाल यांनी आज दिले.

उबाठा सेनेचे नेते स्मारकाच्या विरोधात कोर्टात गेले होते. या याचिकेत विविध आरोप करण्यात आले. विशेषतः मी या स्मारकाच्या ठिकाणी कार्यालय सुरू करणार असल्याचे सांगितले गेले. वास्तविक, माझी स्वतःची तीन ते चार कार्यालये असताना मला आणखी कार्यालयाची काय गरज? स्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर खालून पूर्णतः मोकळा रस्ता असणार आहे असेही आमदार अग्रवाल म्हणाले.

यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, सुनील बैसाणे, भिकन वराडे, शशी मोगलाईकर, आकाश परदेशी, वैशाली शिरसाट, मोहिनी धात्रक, किशोर चौधरी, सुबोध पाटील, पंकज धात्रक, ज्ञानेश्वर पाटील, हर्ष रेलन, भगवान गवळी, पप्पू डापसे, जयेश मगर, बंटी धात्रक, रमेश करनकाळ, विनोद खेमनार, पृथ्वीराज पाटील, सचिन पाटील, पवन जाजू, सुरेश बहाळकर, प्रकाश उबाळे, अनिल सोनार, पंकज विंचू, राकेश कुलेवार, ॲड. किशोर जाधव, उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT