पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
मराठी साहित्य मंडळातर्फे राज्य पातळीवरील नामांकित सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कारांचे वितरण प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते झाले. यामध्ये कवयित्री मंगला रुपसिंग राजपूत यांच्या "उत्सवाचं लेणं" या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार मिळाला. त्यांना साहित्य प्रकारातील संत नामदेव राष्ट्रीय उत्कृष्ट काव्य साहित्य पुरस्कार नुकताच मिळाला आहे. तसेच त्यांचे आकाशवाणी धुळे केंद्रावर सुध्दा कविता वाचन व भाषणाचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे काही वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता व लेख नेहमी प्रकाशित होत असतात. राजपूत यांच्या कविता व लेख दिवाळी अंकात देखील प्रकाशित झाल्या आहेत. मराठी साहित्य मंडळ, मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आयोजक डॉ.जयप्रकाश घुमटकर व परीक्षकांचे त्यांनी याबाबत आभार मानले.