धुळे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे अनुकंपा भरती प्रक्रिया सुलभ झाली. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावतीने आज नवीन नियोजन सभागृहात 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा उमेदवारांची भरती व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री रावल हे मुंबई येथून दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र इगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे, उपजिल्हाधिकारी संदिप पाटील, महसूल तहसिलदार प्रवीण चव्हाणके आदी उपस्थित होते.
यावेळी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. पालकमंत्री रावल म्हणाले की, अनुकंपा नियुक्तीचे सर्व समावेशक सुधारित धोरणानुसार सामान्य प्रशासनाने विभागाने 17 जुलै 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला. या निर्णयामुळे अनुकंपा भरती बाबत यापूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून सर्व समावेशक आणि कालबद्ध कार्यक्रम असलेला हा शासन निर्णय आहे. या निर्णयापूर्वी धुळे जिल्ह्यात गट क चे 34 आणि गट ड चे 31 उमेदवार अनुकंपाच्या सामायिक सूचीमध्ये होते. त्यापैकी गट क च्या यादीतील 2016 पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचा समावेश होता. गट ड च्या यादीतील 2012 पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचा समावेश होता. या निर्णया मुळे बहुतांश उमेदवारांना नियुक्ती मिळाली आहे. आता गट ड च्या व गट क च्या सामायिक सूचीमध्ये तीनच उमेदवार राहिले आहेत.
राज्य शासनाच्या गतिमान प्रशासन 150 दिवसांचा कार्यक्रम आणि सर्व समावेशक आणि सुस्पष्ट धोरणांमुळे आज अनुकंपा व एमपीएससी मधील एकूण 171 उमेदवारांना धुळे जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अनुकंपा तत्वावर नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरतीतील पात्र उमेदवारांना लिपिक नि टंकलेखक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक पणे सेवा करीत सर्व सामान्य नागरिकांची सेवा करावी. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी पारदर्शी पद्धतीने नागरिकांची सेवा करून त्यांच्या विश्वासास पात्र ठरावे. असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी तळपाडे, उपजिल्हाधिकारी पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रवीण काशिनाथ माळी, विनोद भाऊसाहेब शेळके, राजेश शिवाजी जोरवार, रुपाली इमाम जामळकर, सचिन मधुकर वानले, नागलबोने मधु महादेव, दिपाली प्रशांत गोरावडे, नितीन सुकदेव गुठे, पवार प्रतिक्षा रामसिंग, वैभव अशोक देसले, कांचन अनिल बर्डे भूषण आनंदा माळी, यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती आदेश देण्यात आले.