धुळे; पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील जामखेल (Jamkhel murder case) येथे पूर्ववैमनस्यातून कुरापत काढून तरुणाचा खून केला होता. या प्रकरणातील आरोपीला दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. धुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी आज (दि.२९) निकाल दिला. विजय लक्ष्मण पवार असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. (Dhule Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, खून होण्याच्या ६ वर्षापूर्वी आरोपी विजयने मृत सुरेश मोतीराम थवील याच्या पत्नीस पळवून नेले होते. त्या कारणावरून आरोपी व मृत यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्याबाबत पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे मृताने त्यावेळी तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून आरोपी व मृत यांच्यामध्ये वाद चालू होता. त्या कारणावरून दि. ५ मेरोजी सकाळी १० च्या सुमारास साक्री तालुक्यातील जामखेल गावाच्या शिवारात पश्चिमेस असलेल्या मोगराईधार टेकडी जवळ माळरानात मृत सुरेश हा गुरे चारण्यासाठी गेला होता. यावेळी विजयने लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण करून चाकूने छातीत भोसकून ठार केले होते.
तपासी अंमलदार सुनील भाबड यांनी सखोल चौकशी करुन आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोप निश्चितीनंतर खटल्याची सुनावणी धुळे येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे झाली.
सुनावणीच्या वेळेस अतिरिक्त शासकीय अभियोक्ता गणेश वाय. पाटील, यांनी फिर्यादी शांताराम थैल, घटनास्थळ, कपडे जप्ती, हत्यार जप्ती पंच, वैद्यकीय अधिकारी तसेच शव विच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी तसेच या कामातील महत्वाचे ठरलेले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपासी अंमलदार सुनील भाबड आदीसह ८ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात नोंदविल्या. पुराव्यांच्या आधारे गणेश वाय. पाटील यांनी युक्तीवाद केला.त्यानुसार आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजारांचा दंड भरण्याचा आदेश दिला. दंड न भरल्यास एक महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात गणेश वाय. पाटील यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांचे मार्गदर्शन लाभले.