Irregularities in 30 Districts During Preparations for Voter List Revision in the State
धुळे : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन सुरू असून राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये गैरप्रकार सुरू आहेत, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आणि धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केला आहे. धुळे जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये मतदार नोंदणीमध्ये गंभीर अनियमितता होत असल्याचे आरोप समोर आले आहेत. या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या शिष्ट मंडळाने केंद्र व राज्य निवडणूक आयोगाकडे सविस्तर पुरावे सादर केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आणि धुळे विधानसभा मतदार संघांचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आज मुंबई येथे पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली. सध्या राज्यात मतदार यादीचे पुनरावलोकन याची पूर्वतयारी सुरू आहे. मात्र या 30 जिल्ह्यांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचा खळबळ जनक आरोप आज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला.
दिल्ली येथे भारत निवडणूक आयोगच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आज राज्य निवडणूक आयोगासमोरही याबाबत माहिती देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत खा.अनुप धोत्रे, आ. रणदीप सावरकर, आ.अनुप अग्रवाल यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश होता असे ते म्हणाले.
यावेळी सोमय्या व अग्रवाल यांनी मतदार यादीच्या पुनरावलोकन कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला. धुळे, मालेगाव, संभाजीनगर पूर्व, अकोला पश्चिम, अमरावती, मालवणी, मालाड, सिल्लोड, भिवंडी, रावेर, चिखली आदी सुमारे ३० विधानसभा मतदारसंघांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी एकाच व्यक्तीची नावे दोन ते तीन वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे आढळले असून काही प्रकरणांत एकाच वडिलांच्या नावावर २५ ते ५० मुलांची नोंद दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
चिखली मतदारसंघातील सुमारे २० हजार आणि धुळे मतदारसंघातील २२ हजारांहून अधिक डुप्लिकेट नावे आयोगाकडे सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, मालेगाव आणि धुळे या भागांमध्ये जवळपास २५ हजार मतदारांची नावे दोन्ही ठिकाणी असल्याचे फोटो जुळवणीद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. अशी माहिती यावेळी आमदार अग्रवाल यांनी दिली.
याशिवाय, मृत व्यक्तींच्या नावावरही मतदार नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 'स्थिर नोंदणी' प्रक्रियेत १०० टक्क्यांपेक्षा अधिक नोंदी झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. धुळे शहरात काही भागांत रात्री उशिरापर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांकडून संशयास्पद पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याचे छायाचित्रांसह पुरावे आयोगाला देण्यात आल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी शिष्ट मंडळाने आयोगाकडे कारवाई करण्याची मागणी केली. ज्या नावांची पुनरावृत्ती आढळली आहे, तसेच संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे नोंदणी झालेल्या व्यक्तींची सखोल चौकशी करून संबंधित नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत. रात्री अडीच वाजेपर्यंत यंत्रणेतील अधिकारी पाच सहा जणांना सोबत घेऊन अशी बनावट मतदार नोंदणी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरु असल्याचे त्यावेळचे काही फोटो मिळाल्याचे आ. अनुप अग्रवाल यांनी सांगितले.
यावेळी आपण संबंधित अधिकाऱ्यांना पुरावे दिल्याची माहिती आ. अग्रवाल यांनी दिली. दरम्यान, निवडणूक आयोगाने सादर केलेल्या पुराव्यांची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.