अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर,जि.धुळे : पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विजय गांगुर्डे यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.यापूर्वी गटनेते म्हणून त्यांनी केलेल्या प्रभावी,पारदर्शक आणि लोकाभिमुख कामाचीच ही पावती असून, मतदारांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा,स्वच्छता, रस्ते,नागरी सुविधा तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना तत्परतेने न्याय देण्यासाठी विजय गांगुर्डे यांनी नेहमीच पुढाकार घेतला. पक्षीय राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देणारी त्यांची भूमिका नागरिकांच्या मनात ठसा उमटवणारी ठरली.
या निवडणकीत त्यांनी प्रभाग 9 ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरूनही सर्व राजकीय समीकरणे बाजूला सारत स्पष्ट बहुमताने विजय संपादन केला.हा विजय म्हणजे केवळ वैयक्तिक यश नसून,काम करणाऱ्या नेतृत्वावर जनतेचा असलेला विश्वास असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
विजयानंतर नागरिक,कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या उत्साहात पिंपळनेर शहरातील विविध मार्गाने रोडरोलर वर मिरवणूक काढत आनंद साजरा केला.यावेळी विजय गांगुर्डे यांनी पिंपळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत,हा विजय जनतेचा असून,त्यांच्या अपेक्षांवर खरा उतरायचा मी पूर्ण प्रयत्न करेन,अशी प्रतिक्रिया दिली. पिंपळनेर नगरपरिषदेच्या राजकारणात हा निकाल काम करणाऱ्या अपक्ष नेतृत्वाची ताकद दाखवणारा ठरला आहे.
छाया:अंबादास बेनुस्कर