Gujarat Drug Smuggling Maharashtra
धुळे : गुजरात राज्यातून धुळेमार्गे गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) पथकाने उधळून लावला आहे. या कारवाईत 410 औषधी बाटल्या जप्त करण्यात आल्या असून तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा गुजरात-मालेगाव तस्करी साखळी समोर आली आहे.
धुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून गुंगीकारक औषधांच्या अवैध तस्करीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. यापूर्वी झालेल्या कारवायांमध्येही गुजरातमधून महाराष्ट्रात अशा औषधांचा पुरवठा होत असल्याचे निष्पन्न झाले होते. काही बोगस नोंदणीधारक फार्मासिस्टांच्या माध्यमातून हा साठा महाराष्ट्रात आणला जात असल्याची बाब तपासात पुढे आली होती. तरुणांमध्ये नशेसाठी या औषधांचा वापर होत असल्याने पोलिसांनी यापूर्वी वाहतूकदार आणि काही मेडिकल चालकांवर कारवाई केली होती. मात्र मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात यश आले नव्हते.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुंगीकारक औषधांच्या तस्करीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार एलसीबीचे पथक सक्रिय झाले असून पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, हेड कॉन्स्टेबल राहुल सानप, आरिफ पठाण, देवेंद्र ठाकूर, संदीप पाटील आणि विवेक वाघमोडे यांना गुजरातमधून मोठा साठा येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
या माहितीनुसार पथकाने नागपूर-सुरत महामार्गावरील कुसुंबा मार्गे मालेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. जीजे-16-बीबी-2607 क्रमांकाची कार अडवून तपासणी केली असता चालक एजाज रफिक शेख याने संशयास्पद उत्तरे दिली. त्यानंतर वाहनाची सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी रेक्सन आणि केनेक्सटी कंपनीच्या 410 औषधी बाटल्या आढळून आल्या.
सदर औषधे विशिष्ट वैद्यकीय उपचारांसाठी वापरली जात असली तरी त्यांचा गैरवापर नशेसाठी होत असल्याचे यापूर्वीच्या तपासांत समोर आले आहे. चालकाकडे औषध वाहतुकीसंदर्भातील कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी वाहनासह संपूर्ण साठा जप्त केला.
या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी विवेक वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून एजाज रफिक शेख (सुरत), प्रवीण जीवराम सिरवी (वैद्यकीय व्यावसायिक, सुरत) आणि आमीन शहा (मालेगाव) यांच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान एलसीबीच्या पथकाने सुरत येथील प्रवीण जीवराम सिरवी आणि इरफान उर्फ भिका इस्माईल मुलतानी यांना अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत तिघे जण पोलिसांच्या ताब्यात असून गुंगीकारक औषधांचा साठा नेमका कोणाकडून प्राप्त झाला आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध सुरू आहे.
प्राथमिक तपासात या तस्करीमागील मुख्य जाळे गुजरातमध्ये कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणातील औषधसाठा प्रथम मालेगाव येथे पोहोचवून तेथून विविध भागांत वितरित केला जात असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोलीस कधी पोहोचतात, याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे.