धुळे

Fraud Call | ‘लष्कर ए तय्यबा’ संघटनेसाठी काम करण्याचे आमिष, धुळ्यात दोघांना अटक 

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा– अंतरराष्ट्रीय व्हॉटसअप व्हर्चुअल नंबर वरून बनावट कॉल करून दहशतवादी संघटना असणाऱ्या लष्कर ए तय्यबा या संघटनेसाठी काम करण्याचे अमिष देणाऱ्या दोघांना धुळे सायबर पोलीसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे फिर्यादी आणि दोन्ही आरोपी हे चांगल्याच परिचयाचे असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. मात्र बनावट व्हर्चुअल नंबर घेऊन अशा पद्धतीने दहशतवादी संघटनेचे नाव वापरल्याने धुळ्याचा पोलीस विभाग सतर्क झाला यातून दोनही आरोपींच्या मुस्क्या आवळण्यात आल्या आहे.

धुळे येथील चाळीसगाव रोड परिसरातील जिल्हा परभणी मध्ये राहणारे इमरान हारून शेख हे ठाणे येथील जय टायगर सिक्युरिटी एजन्सी साठी काम करतात. ते दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी त्यांचे घरी असतांना त्यांना रात्री ०८.१५ वाजता त्यांच्या मोबाईल नंबरवर अंतरराष्ट्रीय कोड असलेला + १ (५६७) ३२८-५२५१ या नंबर वरून व्हॉटसअप कॉल आला. त्यावर अज्ञात इसमाने तो लष्कर ए तय्यबा या अतिरेकी संघटनेतून बोलत असल्याचे सांगून तक्रारदारास आमिष दाखवून फसविण्याचा प्रयत्न केला. यावेळी इमरान याने अशा पद्धतीने देशद्रोह करून नका, असे सांगून दूरध्वनी करणाऱ्याला सुनावले. मात्र कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी इमरान शेख यांनी लागलीच सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दिला. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सदर प्रकारणाच्या मुळाशी जावून वापरण्यात आलेल्या अंतरराष्ट्रीय व्हर्चुअल नंबरची माहिती काढण्या बाबत सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाला सुचना केल्या.

कॉल खरा वाटावा म्हणून …

तदनंतर सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी या प्रकरणी तांत्रीक विष्लेक्षण व सखोल चौकशी सुरू केली. यात विदेशी वाटावा असा नंबर कशा पद्धतीने घेण्यात आला याची माहिती देखील घुसर यांनी घेतली. या चौकशीमध्ये इमरान शेख याला त्याच्या समवेत संपर्क असणाऱ्या दोघांनी अशा पद्धतीने फोन केल्याची बाब देखील तपासात निदर्शनास आली. फिर्यादीच्या परिचयातील इसम नामे ऋषीकेश नरेंद्र भांडारकर (रा. शनी मंदीरा जवळ, देवपुर, धुळे) यांनेच यातील तक्रारदारास अंतरराष्ट्रीय व्हर्चुअल नंबरच्या माध्यमातून व्हॉटअसप कॉल केल्याचे निष्पन्न झाले. सदर कॉल वरील संभाषण खरे वाटावे यासाठी ऋषीकेश नरेंद्र भांडारकर याचा मित्र नामे खालीद अन्सारी याने फोन वरून हिंदी भाषेत संभाषण करून फिर्यादीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कॉल केला असल्याचे समोर आले आहे.

दोघेही धुळे शहरातील

वरील दोन्ही आरोपी हे धुळे शहरातील आहेत. त्यांनी स्वतःची ओळख लपवून त्यांच्याच परिचयातील फिर्यादी इमरान हारून शेख यास खोडसाळपणे व्हर्चुअल नंबरच्या सहाय्याने कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून आणखी विचारपूस सुरू आहे. पुढील तपास सायबर पोलीस स्टेशन करीत आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT