Fake Steel Factory
धुळे : घरात छताच्या पिओपी सुशोभीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या नामांकित कंपनीचे नाव वापरून स्टीलच्या बनावट पट्ट्या तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला असून कारखान्यातून मुंबई येथील एका नामांकित कंपनीच्या माध्यमातून तयार होणाऱ्या पट्ट्यांचे बनावटीकरण सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे. या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथील सर्फराज अब्दुल रऊफ तांबोळी, यांनी चाळीसगांव रोड पोलीस स्टेशनला यासंदर्भात तक्रार दिली. धुळे येथील शंभर फुटी रोड परिसरात मुंबई येथिल सेंट गोबीन इंडिया प्रा.लि. या कंपनीने विकसित केलेल्या डिझाईन, पॅटर्न प्रमाणे सिलींग पटटया व बॉटम पटटया प्रमाणे दिसणाऱ्या बनावट मालाची निर्मीती सुरु असुन विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचा साठा केला असल्याची तक्रार झाली. या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी छापा घालणे गरजेचे असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांना या बनावटीकरनाचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी दिली.
या नंतर धुळे येथे तसेच मुंबई आग्रा महामार्गाजवळील गोल्डन पार्क जवळ असलेल्या गोडावन येथे छापा कारवाई करण्यात आली. सदर छापा कारवाई दरम्यान दुकान व गोडावन मालक मुख्तार खान शहजाद खान यांच्याकडुन बनावट माल जप्त करण्यात आला.
यात सिलिंग पटटया बनवण्यासाठी वापरण्यात येणारे एकुण ६ नग लोखंडी डाय, एकुण ६०० नग एल पटटी सिलिंग बॉटम पटटया व एल पटटी उत्पादन करणारे २ मशिन, स्टीलच्या बॉटम पटटया एकुण १२ नग , सिलिंग पटटया एकुण १५० नग, पॅरामिटर पटटया २० नग असा ३, लाख ७७, हजार ३४० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
छापा कारवाई दरम्यान सेंट गोबीन इंडिया यांनी विकसित केलेल्या डिझाईन, पॅटर्न प्रमाणे सिलींग पटटया व बॉटम पटटया वरील डिझाईन प्रमाणे धुळ्यातील स्मार्ट स्टिल दुकान व गोडावनचे मालक मुख्तार खान शहजाद खान यांनी कॉपी करुन त्याद्वारे स्टिलच्या बॉटम पटटया व सिलिंग पटटया तयार करुन त्या विक्री करण्याकरीता साठा करुन सेंट गोबीन इंडिया या कंपनीची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाल्याने मुख्तार खान शहजाद खान यांच्याविरोधात बीएनएस कलम ३१८(४) सह प्रतिलिपी अधिकार अधिनियम १९५७ (कॉपी राईट अॅक्ट) कलम ५१,६३,६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.